|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर परिसरात ठिकठिकाणी कोंडी

शहर परिसरात ठिकठिकाणी कोंडी 

प्रतिनिधी/ बेळगाव

वाहतुकीची कोंडी ही बेळगावकरांची नेहमीचीच डोकेदुखी आहे. रोज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी अक्षरशः वैतागले आहेत. अधूनमधून पडणाऱया पावसामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडत होता. त्यामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागला. शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. यामुळे अनेकांना ताटकळत थांबावे लागले. काही ठिकाणी रहदारी पोलीस नसल्यामुळे संतापही व्यक्त करण्यात येत होता.

शहराचा वाढता पसारा आणि बाहेरून येणाऱया वाहनांची संख्या अधिक झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीचेच राहिल्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसू लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. पण त्यांना यश येत नाही. मंगाई देवीची यात्रा मंगळवारी झाली असली तरी बुधवारीही भाविकांची गर्दी होती. यामुळे या भाविकांची कोंडी खासबाग, शहापूर परिसरातही दिसून येत होती. परिणामी एसपीएम रोड, काँग्रेस रोड, शनिमंदिर रोड, ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या.

रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चक्क होमगार्डना नियुक्त केले आहे. मात्र, त्यांनाच वाहतुकीचे नियम माहिती नाहीत. त्यामुळे ते वाहतुकीला शिस्त कशी लावणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काही उद्धट वाहनचालक त्यांच्यावरच दादागिरी करून पुढे जाताना दिसत होते. शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये होमगार्ड्सची नियुक्ती केली गेली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी आणखी वाढली आहे. चारी बाजूने वाहनचालक पुढे येण्यास सरसावत आहेत.

मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होऊ लागली आहे. यामध्ये काही अवजड वाहने घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यांवरच पार्क केली जात आहेत. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे.