|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’

रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’ 

धावपट्टी नूतनीकरणानंतरची चाचणी सफल

कोस्टगार्डच्या ‘डार्नियर’चे लँडींग

तटरक्षक महानिरीक्षक चाफेकर यांची पाहणी

तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर विमानतळ सेवेसाठी सज्ज

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळाच्या धावपट्टी नूतनीकरणाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमान सेवा लवकरच पुन्हा सुरू होण्याचे शुभसंकेत मिळाले आह. गुरूवारी तटरक्षक दलाच्या डार्नियर विमानाने यशस्वी ‘लँडिग आणि टेकऑफ’ केल्याने हा विमानतळ आता सागरी सुरक्षिततेसाठी सज्ज झाला आहे.

पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरीच्या विमानतळाला अनन्य साधारण महत्व आहे. हा विमानतळ कोस्टगार्डकडे हस्तांतरीत झाल्यानंतर त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला. धावपट्टी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने 2015 पासून विमानतळ बंद आहे. केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. धावपट्टीचे काम आता काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी गुरूवारी कोस्टगार्डकडून घेण्यात आली.

या विमानतळावर गुरूवारी सकाळी 8.30 च्या सुमारास डार्नियर विमानाने यशस्वी लँडिंग करीत तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर, पीटीएम, टीएम यांचे आगमन झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. यावेळी त्यांनी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली.

रत्नागिरीतील कार्यालयाचे प्रमुख कमांडंट एस.आर.पाटील यांनी या टीमचे विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती बंदर येथे उभारले जाणारे जहाज दुरूस्ती केंद्र व जेट्टी, भाटय़े येथे उभारले जाणारे होवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण, आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱया पायाभूत विकासकामांबद्दल कमांडंट एस.आर.पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.

त्यादरम्यान या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाटय़े बीच येथील तटरक्षक दलाच्या भूखंडावर जाऊन आगामी काळात सुरू होणाऱया प्रकल्पाची माहिती घेतली. दुपारी 12.30 वा. त्यांनी तटरक्षक रत्नागिरीच्या सर्व कर्मचाऱयांशी संवाध साधला. रत्नागिरी येथे सुरू विकासकामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रत्नागिरी हे लवकरच तटरक्षक दलाचे एक अद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्यक सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या हेतूने प्राथमिकता दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचाऱयांच्या सदनिकांसाठी प्रयत्न

तटरक्षक दलाच्या रहिवाशी सदनिका व सेना दलातील जवानांना दिल्या जाणाऱया सर्व सोयी सुविधा रत्नागिरी येथे लवकरात लवकर उभारण्यात येतील असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. या पाहणीनंतर दुपारी 1.45 वा. त्यांच्या विमानाने मुंबईसाठी यशस्वी उड्डाण केले. यावेळी वायु अवस्थानचे कमान अधिकारी कमांडंट ए.सी.दांडेकर, कमांडंट आचार्युलु, तांत्रिक अधिकारी उपसमादेशक सुनील चौहान, चिकीत्सा अधिकारी प्रशांत, उपसमादेशक अभिषेक करुणाकार आदी उपस्थित होते.

महानिरीक्षक विजय डी चाफेकर यांच्याविषयी…

लक्षद्विप सहित दमन ते कन्याकुमारी पर्यंतचे कार्यक्षेत्र असणाऱया संपूर्ण देशाच्या तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून 10 एप्रिल 2018 रोजी महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांनी मुंबई येथील वरळी स्थित मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना तटरक्षक दलातील सेवेसाठी दिली जाणारी राष्ट्रपती पदक व तटरक्षक पदक यांनी सन्मानित केलेले आहे. ते एक निष्णात वैमानिक असून त्यांनी शीघ्रगती गस्ती नौका, ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका, प्रगत ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका यांवर यशस्वीरित्या कमान सांभाळली आहे. तसेच चेन्नई व कोची येथील तटरक्षक जिल्हा मुख्यालयाचे आणि नाविक ब्युरोचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यु पोर्ट येथील नेवल स्टाफ कॉलेजमधून विशेष प्राविण्यासह ग्रॅज्युएशन आणि नौदल उच्च कमान कोर्स पूर्ण केलेले आहेत. सागरी कायद्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि संरक्षण व धोरणात्मक अभ्यास यात त्यांनी एम फिल केले आहे.

Related posts: