|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालकी मिळाली, आता प्रतीक्षा नामकरणाची

मालकी मिळाली, आता प्रतीक्षा नामकरणाची 

 • निवती समुद्रातील ‘ती’ 14 बेटे नामकरणाच्या प्रतीक्षेत
 • पर्यटनासाठी ब्रँडिंग आणि ब्रँडिंगसाठी नामकरण आवश्यक
 • सबमरीन आणि आयलँड टुरिझमपूर्वी नामकरण हवे
 • नीन बेटांवर होणार पर्यटन सुविधा
 • मालवणप्रमाणे वेंगुर्ल्यातही बहरणार सागरी पर्यटन

1. एरियल कॅमेऱयातून वेंगुर्ले समुद्रात उभ्या असलेल्या बेटांचे होणारे दर्शन 2. पर्यटकांच्या नजरा खेचून घेणारे ‘गोल्डन रॉक’ नावाने ओळखले जाणारे हेच ते बेट.

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्गच्या समुद्रातील निवतीरॉक हद्दीतच तिन बेटे 7/12 वर आणण्याची प्रक्रीया तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पार पाडल्यानंतर मात्र सागरी पर्यटनाच्या दृष्टीने बँडींग करीता आवश्यक असणारी त्यांच्या नामकरणाची प्रक्रीया अद्याप रखडून पडली आहे. वेंगुर्ले समुद्रात होऊ घातलेल्या ‘सबमरीन टुरिझम’ व ‘आयलँड टुरिझम’साठी ही बाब अत्यंत महत्वाची असून आता विद्यामान जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी याकामी जातीनीशी लक्ष घालावा अशी मागणी सिंधुदुर्गवासीयांकडून होत आहे.

  मालवण तालुक्यात किल्ले सिंधुदुर्ग, तारकर्ली बीच व त्सुनामी आर्यलंड सारख्या पर्यटनस्थळांचे ब्रँडींग झाल्यानंतरच ही स्थळे जगाच्या नकाशावर झळकली आणि पुढे या ठिकाणी पर्यटन बहरले. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आता पर्यटनाच्या दृष्टीने वेंगुर्ले तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले असून, सबमरीन टुरिझमच्या माध्यमांतून वेंगुर्ले तालुक्याकडेही जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढेल या दृष्टीने त्यांनी हे टुरिझम या ठिकाणी सुरुही होईल. परंतू तत्पूर्वी जगभरातील पर्यटकांच्या नजरा या वेंगुर्ले किनारपट्टीकडे वळल्या पाहीजेत तर येथील पर्यटन स्थळांचे ब्रँडींग होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम वेंगुर्ले-निवती समुद्रात अद्भुत अशा जैवविविधतेने वेढलेली निवती रॉक, जुना दिपगृह, बर्नआर्यलंड यांसह 7/12वर आलेली जी 14 बेटे आहेत त्या बेटांचे अधिकृत नामकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. लाखो वर्षापासून ही बेटे बेवारस पणे वेंगुर्ले समुद्रात होती. वरील 3 प्रमुख बेटांपैकी दोन बेटांचा वापर ब्रिटीश ते पोर्तुगिज काळापासून लाईट हाऊस म्हणून होत असला तरी देखील त्यावर कुणाचीही मालकी नव्हती. थोडक्यात शासन दप्तरी कुठल्याही 7/12 वर या बेटांची नेंदच नव्हती. त्यामुळे ही बेटे बेवारस स्थितीत होती. सागरी पर्यटनाच्या नजरेतून या बेटांचे महत्व ओळखून नुकतेच बदलून गेलेले जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी विशेष मोहीम हाती घेऊन या 14ही बेटांचा सर्व्हे करत ती प्रथम शासनाच्या 7/12 वर आणत त्याची मालकीपण राज्यशासनाला मिळवून दिली. आता ही बेटे अधिकृतपणे राज्यशासनाच्या मालकी हक्कात आल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे शासनाला शक्य होणार आहे.

ब्रँडींगसाठीच नामकरण हवेच

   महत्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले समुद्रात ‘सबमरीन व आयलँड टुरिझम’ विकसीत करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. वेंगुर्ले समुद्रातील निवतीच्या परिसरात जी ही बेटे आहेत त्या परिसरातच ही सबमरीन फिरवून तेथील समुद्राखालील अद्भूत जग पर्यटकांना दाखविले जाणार आहे. त्यामुळे ही बेटे जागतिक पर्यटन नकाशावर येणार आहेत. या तिन पैकी सध्याचा दिपगृह असलेल्या बेटाला ‘निवतीरॉक’ किंवा ‘वेंगुर्लेरॉक’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या बाजूला जो जुना दिपगृह आहे त्याला तर नावच नाही. तर तिसरे जे बेट आहे. ज्यावर स्विफ्ट पक्षांची वसाहत आहे त्या बेटाला ‘बर्न आयलँड’ म्हणून ओळखले जाते. उर्वरीत 11 बेटांचीही अशीच काहीशी अवस्था आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून या बेटांचे जर ब्रँडींग करायचे असेल तर या बेटांना पर्यटकांचा लक्ष वेधून घेतील अशा पद्धतीची नावे द्यावी लागतील. जसे देवबाग मधील बेटाला कुणीतरी ‘त्सुनामी आयलँड’ असे नाव दिल्यानंतर त्या बेटाकडे पर्यटकांचे लक्ष गेले आणि पुढे तिथे पर्यटन बहरले. वेंगुर्ले-निवती समुद्रातील त्या बेटांना अशाच पद्धतीची नावे दिली पाहीजेत जेणेकरुन साऱया जगाचा या बेटांकडे लक्ष गेला पाहिजे. या ठिकाणी सबमरीन टुरिझम विकसीत होण्यापूर्वी ही नामकरणाची प्रक्रीया पूर्ण होणे गरजेचे आहे.

डॉ.सारंग कुलकर्णी

नामकरणासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा- डॉ.सारंग कुलकर्णी

  दरम्यान या नामकरणाबाबत बोलतांना सागर संशोधक व तारकर्ली स्कूबा डायव्हींग सेंटर चे व्यवस्थापक डॉ.सारंग कुलकर्णी म्हणतात… पर्यटन विकासात ब्रँडींग चे योगदान फार मोठे असते. व्यावसाईक दृष्टय़ा ब्रँडींगला फार महत्व असते. वेंगुर्लेत होऊ घातलेले सबमरीन टुरिझम निवती समुद्रातील या 14 बेटांच्या परिसरात केंद्रभूत होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम ब्रँडींगच्या माध्यमांतून ही सर्व बेटे जगाच्या पर्यटन नकाशावर आणली पाहिजेत. या ब्रँडींगसाठी या बेटांना चांगली नावे दिली गेली पाहिजेत. यासाठी जिल्हाप्रशासनाने तत्काळ पुढाकार घेऊन चांगल्या नावांसाठी सिंधुदुर्गवासीयांना आवाहन केले पाहिजे. यासाठी एक स्पर्धाही ठेवली पाहिजे. जेणेकरुन या बेटांकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेता येईल. जिल्हाधिकारी पांढरपट्टे या कामी निश्चितच पुढाकार घेतील असा आपणास विश्वास असल्याचे ते म्हणाले.

पाण्याखालील अद्भूत जग दाखवणारी अशी असेल सबमरीन.

असं होणार आयलँड पर्यटन

 • आयलँड पर्यटनाच्या माध्यमातून बेटांचा होणार विकास
 • ‘निवती रॉक’वर फ्लोटिंग जेटी व ‘पाथ वे’ चे काम लवकरच होणार सुरू
 • प्रादेशिक पर्यटन फंडातून 61 लाखाचा निधी प्राप्त
 • दुसऱया टप्प्यात बेटांवर रेस्टॉरंट, निवासव्यवस्था व व्हय़ूव्हींग डेक उभारणार
 • कामाच्या निविदेची प्रक्रियाही पूर्ण
 • एकापाठोपाठ एक इतर बेटांचाही होणार विकास
 • जैवविविधतेला बाधा न पोहोचवता होणार विकास

Related posts: