|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » एशियाड स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजवाहक

एशियाड स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजवाहक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Rयंदाच वर्षारंभी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदा जकार्ता, इंडोनेशिया येथील एशियाड स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात भारतीय पथकाचे नेतृत्व करेल. नीरज पथसंचलनात भारतीय ध्वज घेऊ सहभागी होईल, अशी घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी केली. भारतीय पथकाच्या छोटेखानी निरोप सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते.

नीरजने यापूर्वी जुलैमध्ये फिनलंडमधील सॅवो गेम्समध्ये जिंकले होते. तेथे त्याने चायनीज तैपेईचा प्रतिस्पर्धी चाओ-त्सून चेंगला फायनलमध्ये नमवले होते. 85.69 ची फेक नोंदवत त्याने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. याशिवाय, मे मध्ये दोहा येथे संपन्न झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने 87.43 मीटर्सचा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. त्याच्या खात्यावर 86.48 मीटर्सचा यू-20 विश्वविक्रमही नोंद आहे. 2017 मध्ये 85.23 मीटर्सच्या फेकीसह त्याने आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिपचे सुवर्ण जिंकले. याशिवाय, पोलंडमध्ये संपन्न झालेल्या 2016 आयएएएफ यू-20 चॅम्पियशिपमध्ये तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

‘एशियाड स्पर्धेत ध्वजवाहकाचा सन्मान लाभल्याने मी अर्थातच रोमांचित झालो आहे. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे अर्थातच सर्वोच्च सन्मानाचे आहे’, असे त्याने फिनलंडमधील आपल्या सराव शिबिरातून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, भालाफेकीचा इव्हेंट 27 ऑगस्ट रोजी असल्याने नीरज उशिराने जकार्ताला रवाना होणार होता. पण, आता पथकाचेच नेतृत्व त्याला करायचे असल्याने दि. 18 पूर्वीच जकार्तात दाखल होण्याची त्याला सूचना केली गेली आहे.

अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनचे सचिव सी. के. वळसन यांनी नीरज दि. 17 ऑगस्ट रोजी जकार्तात पोहोचेल, अशी माहिती यावेळी दिली. त्यानंतर पहिले भारतीय ऍथलेटिक्स पथक जकार्तामध्ये दि. 21 ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे.