|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षकांचे 20 रोजी पनवेलला धरणे आंदोलन!

शिक्षकांचे 20 रोजी पनवेलला धरणे आंदोलन! 

सरकारच्या धोरणांविरोधात कॉलेज शिक्षक छेडणार विविध आंदोलने : मागण्या मान्य न झाल्यास 25 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन

वार्ताहर / कणकवली:

सरकार सातत्याने शिक्षकांच्या विरोधी भूमिका घेत आहे. शिक्षकांचे निवृत्तीचे वय कायम ठेवून प्राचार्यांना निवृत्ती वय वाढवून देणे, यूजीसीच्या रजा धोरणांची अंमलबजावणी न करणे, पदोन्नत्ती, वेतनवाढी, कामांचे तास आदी घटकांमधून सरकारचा शिक्षक विरोधी सूर दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनांचा महासंघ (एमफुक्टो) यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन शिक्षक विविध प्रकारची आंदोलने छेडणार असल्याचे बुक्टू संघटनेचे सदस्य प्रा. विनोदसिंह पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संघटनेच्या मागण्यांमध्ये राज्य शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रिक्तपदे तात्काळ भरावीत. प्राध्यापकांचे 71 दिवसांचे प्रलंबित वेतन त्वरित अदा करावे, शिक्षकांना देय होणारी थकबाकी भागविण्यासाठी 100 टक्के केंद्र सरकारने निधी द्यावा, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘समान काम समान वेतन’ या आदेशाची अंमलबजावणी करून कंत्राटी शिक्षकांना नियमित करावे व या शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे.

तक्रार निवारण समिती स्थापन करावी

विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या न्यायाधिशांची तक्रार निवारण समिती स्थापन करावी, सहाव्या वेतन आयोगातील शिफारशींच्या अंमलबजावणीतील त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करावी, यूजीसीच्या नियमानुसार सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवून द्यावे, उच्च शिक्षण संचालक व सहसंचालक यांच्या कार्यालयातील एकाधिकारशाही संपुष्टात आणावी या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.

आंदोलनाचा नियोजित कार्यक्रम जाहीर

7 ते 18 ऑगस्टपर्यंत शिक्षकांच्या विद्यार्थी-पालक सुसंवाद सभा आयोजित करण्यात येत आहेत. 20 ऑगस्ट रोजी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय, पनवेल येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. 27 ऑगस्ट रोजी उच्च शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन, 4 सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक न्यायालयीन अटक करून घेत काळा दिवस पाळणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी शिक्षकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन छेडण्यात येणार आहे. या मागण्यांबाबत शासनाने तोडगा काढला नाही, तर 25 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशा इशारा एमफुक्टोचे डॉ. तपती मुखोपाध्याय, डॉ. एस. पी. लवांदे, बुक्टूचे सदस्य प्रा. विनोदसिंह पाटील व डॉ. शंकर वेल्हाळ यांनी दिला आहे.