|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुकन्येची ‘दोस्तीगिरी’ पडद्यावर

सिंधुकन्येची ‘दोस्तीगिरी’ पडद्यावर 

पाटच्या पूजा मळेकरचा स्वप्नवत प्रवास : शिक्षण सावंतवाडीत

प्रतिनिधी / सावंतवाडी:

ती सामान्य कुटुंबातील. पण तिने एक स्वप्न पाहिले. तिला चंदेरी दुनियेची वाट खुणावत होती. मग तिने धैर्याने स्वत:च मार्ग शोधला. आज तिची प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट येतोय. तिच्यासाठी हा क्षण आजही स्वप्नवतच आहे.  

पूजा दयाळ मळेकर हिची ही कहाणी. पूजा मूळची पाट-परुळे येथील. तिचे वडील पोलिसात नोकरीला. पूजाचे माध्यमिक शिक्षण सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात झाले. त्यामुळे येथील विश्वात ती परिचित आहे. फिल्मी दुनियेत पाऊल टाकायचे निश्चित झाल्यावर तिला पहिले पाठबळ घरातून मिळाले. वडील दयाळ यांनी
प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिला हुरुप आला.

सुरुवातीचा प्रवास खडतरच होता. तिने शॉर्ट फिल्म, अल्बम, मालिकांमध्ये कामे केली. स्टेज शो केले. ‘कातळीची विहीर’ ही तिची पहिली ‘शॉर्ट फिल्म’. पण ती रिलिज झाली नाही. तरीदेखील त्यातून तिला अभिनयातील बारकावे शिकता आले. अखेर 2016 मध्ये तिला मराठी चित्रपटाची ऑफर आली. जानेवारी 2016 मध्ये ‘दोस्तीगिरी’चे शूटिंग सुरू झाले. संपूर्ण शूटिंग रत्नागिरी जिल्हय़ात झाले आहे. ‘मोर्या क्रिएशन्स’ या बॅनरखालील या चित्रपटाचे दिग्दर्शक रत्नागिरीचे विजय शिंदे आहेत. तर निमांता संतोष पानकर आहेत.

पूजा सांगते, दोस्तीगिरी ही मित्रांची कथा आहे. पण फक्त मैत्री नव्हे तर मस्ती, मजाही आहे. मी त्यात लव्हस्टोरी प्रेझेंट केली आहे. माझ्यासोबतच पूजा जैस्वाल, संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गीते यांच्या भूमिका आहेत. प्रेक्षकांना ही फिल्म नक्कीच आवडेल, असा विश्वास तिला वाटतो. भविष्यात मालिकांमध्ये काम करण्याचा तिचा मानस आहे.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये आज प्रमोशन

 ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यातील कलाकार झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या भागाचे प्रसारण 13 आणि 14 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता होणार आहे. तर चित्रपट 24 ऑगस्टला
प्रसारित होणार आहे.