|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा

गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा 

पालिकेने मागील सुगंधित दुधाची बाधा, खिचडीची बाधा असो वा आता घडलेली औषधी गोळय़ांची बाधा या घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी.

 

मुंबईतील गोवंडी, संजयनगर येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील 219 विद्यार्थ्यांना औषधी गोळ्य़ांमधून विषबाधा झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. यामध्ये चांदणी शेख (12) या विद्यार्थिनीचा मफत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. तर काहींचा आरोप आहे की, खिचडी खाल्ल्याने ही विषबाधा झाली. या सर्व घटना प्रकारामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग रडारवर आहे.

यापूर्वीही पालिकेच्या शाळेत अन्नातून म्हणजे सुगंधित दुधातून काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची घटना एक नव्हे तर दोनवेळा घडली होती. त्यावेळी शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर असताना त्यांच्या पुढाकारातून पालिकेच्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय वस्तू देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने व काहींना पौष्टिक आहारही मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी काही वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांना वेलची, स्ट्रॉबेरी अशा चवीचे सुगंधित दूध टेट्रापॅकमधून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र 2010 ते 2012 या कालावधीत या सुगंधित दुधामुळे काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे त्यांना मळमळ होणे, उलटय़ा होणे, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे होणे असे त्रास झाल्याच्या घटना 6 वेळा घडल्या. मात्र, या दूधबाधा झाल्याच्या अधिकतर घटना या उर्दू माध्यमांच्या शाळेत घडल्या आहेत. मुस्लिम मुलांबाबत जास्त घडल्या असून त्यावेळी तर काही जणांनी ही मुस्लिम मुले रात्री मांसाहार करीत असल्याने व दुसऱया दिवशी सकाळी दूध प्यायल्याने ते दूध पचन न झाल्याने कदाचित बाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर त्यावेळी दुधात दोष असल्याचा व दुधात दोष नसल्याचा असे दोन अहवाल दोन प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते. त्यामुळे या घटनांचे तीव्र पडसाद पालिकेत उमटले व अखेर हे सुगंधित दूध देण्याची योजनाच बंद करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांना चिक्की, बिस्किट्स, शेंगदाणे देण्याचे पर्याय काही नगरसेवकांनी सुचवले. मात्र, दूध बंद झाले व त्या दुधासह हे पर्यायही  कागदावरच राहिले.

 औषधी गोळय़ांच्या माध्यमातून अथवा खिचडीच्या माध्यमातून जी काही विषबाधा विद्यार्थ्यांना झाली ही घटनाही उर्दू शाळेत म्हणजे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या बाबतीतच घडलेली आहे. ज्याप्रमाणे सुगंधित दूध योजना बंद झाली त्याप्रमाणेच आता या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची औषधी गोळय़ा व खिचडी देण्याची योजनाही बंद होणार की काय, अशी शंका निर्माण होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या सर्व घटनेत पालिका यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे सांगत आपले हात अगोदरच वर केले आहेत. पालिका आरोग्य खात्याच्या प्रमुख पद्मजा केसकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, महापालिकेच्या या उर्दूशाळेतील विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट रोजी लोह व फॉलिक ऍसिडयुक्त औषधी गोळय़ा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यादिवशी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. त्यानंतर ज्या विद्यार्थीनीचा गुरुवारी रात्री उलटय़ा होऊन दुर्दैवी मफत्यू झाला ती चांदणी मोहम्मद शेख (12) ही विद्यार्थिनी 7 ऑगस्टला शाळेत आली नव्हती. ती 8 व 9 ऑगस्ट रोजी शाळेत आली होती. मात्र, त्यावेळीही तिला कसलाही त्रास झाल्याची तक्रार नव्हती. मात्र, गुरुवारी रात्री तिला उलटय़ा झाल्या व त्यातच तिचा दुर्दैवी मफत्यू झाला. त्यानंतर तिचा मफतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व काही पालकांनी शुक्रवारी त्यांच्या मुलांना राजावाडी व शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावर बालरोगतज्ञांनी या सर्व मुलांची तपासणी करून त्यांना तपासून व उपचार करून घरी सोडले. वास्तविक, देशभरातील विविध शाळांमधील विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत लोह व ऍसिडयुक्त जंतनाशक गोळय़ांचे वाटप करण्यात येत असते. मात्र, कोठेही अनुचित घटना घडलेली नाही, असा खुलासा केसकर यांनी करीत पालिकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्या मफत मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या फुफ्फुसात टीबी आढळून आल्याने कदाचित त्यामुळे तिला रक्ताच्या उलटय़ा होऊन तिचा मफत्यू झाल्याचा अहवाल आला असल्याचे समजते. मात्र, याप्रकरणी ज्यावेळी चौकशी अहवाल प्राप्त होईल तेव्हाच ही घटना का घडली त्याचे खरे कारण समोर आल्यानंतर सर्वच शंकाकुशंकवरून पडदा उठणार आहे.

 मात्र या घटनाप्रकारामुळे संतप्त पालकांनी त्या विद्यार्थीनीच्या मफत्यूच्या घटनेनंतर आपल्या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते तर काही संतप्त नागरिकांनी त्या शाळेत धाव घेऊन या शाळेची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या शाळेत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच जमावाला सौम्य लाठीमार करून हटविल्याने पुढील घटना प्रकार टळला. त्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर असून ते नीटपणे न हाताळले गेल्यास त्याचे वेगळे पडसाद उमटू शकतात. या शाळेत देण्यात आलेल्या औषधी गोळय़ांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी एफडीएने ताब्यात घेतले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत देण्यात आलेल्या खिचडीमध्ये वापरण्यात आलेल्या कोरडय़ा अन्नाचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची चाचणी करून येत्या आठवडाभरात त्याचा अहवाल दिला जाणार असल्याचे समजते. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या आगामी स्थायी समिती व पालिका सर्वसाधारण बैठकीत उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेषत: विरोधी पक्ष, समाजवादी पक्षाचे गटनेते आणि पहारेकरी भाजपकडून पालिका प्रशासनाला या घटनेबाबत चांगलाच जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाला व सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांना थोपविणे जरा अवघडच होणार असल्याचे दिसते. कदाचित विरोधकांकडून मफत विद्यार्थीनी चांदणी शेख हिच्या कुटुंबाला पालिकेने आर्थिक मदत देण्याची आणि या प्रकरणी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ शकते.

मात्र, पालिकेने मागील  घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी. अन्यथा पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मारुती मोरे