|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » करुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी

करुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी 

स्टॅलिन-अळगिरी यांच्यात नेतृत्वासाठी चढाओढ : आज पक्षाध्यक्ष निवड

वृत्तसंस्था/ चेन्नई

द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे निधन झाल्यानंतर पक्षामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष उफाळून आला आहे. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि एम. के. अळगिरी या दोघांनीही करुणानिधी यांचा उत्तराधिकारी असल्याचा दावा केला आहे. करुणानिधी यांच्या पक्षातील विश्वासू सहकाऱयांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अळगिरी यांनी केला, तर द्रमुककडून तो फेटाळण्यात आला.

मंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार असल्याने त्यावेळी नवीन पक्षाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. करुणानिधी यांच्या विश्वासू सहकाऱयांचा आणि समर्थकांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी आपल्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. आता काळच योग्य ते उत्तर देईल. पक्षाध्यक्षाची निवड ही निवडणुकीच्या माध्यतातूनच करण्यात येणार आहे, असे त्यांनी विधान केले.

करुणानिधी यांचे पुत्र अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यातील मतभेद सार्वजनिक आहेत. स्टॅलिन यांच्याविरोधात अळगिरी यांनी विधान केल्याने 2014 मध्ये त्यांना आणि त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर 2016 मध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभेची निवडणूक स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत द्रमुकचा पराभव होऊनही स्टॅलिन यांचे पक्षामध्ये वर्चस्व आहे. यानंतर त्यांनी अळगिरी यांच्या समर्थकांना पक्षातून हाकलले होते. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यापासून अळगिरी हे प्रसारमाध्यमांपासून दूर आहेत.

करुणानिधी यांच्या कार्यकाळात स्टॅलिन यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता त्यांच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र तामिळनाडूतील दक्षिणेकडील जिल्हय़ांमध्ये अळगिरी यांचा प्रभाव जास्त आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी ते या जिल्हय़ांतील पक्षाचे सचिव होते. स्टॅलिन आणि अळगिरी यांच्यातील वैमनस्य अनेक वर्षांपासून होते. मात्र ते जानेवारी 2014 मध्ये उघडकीस आले. अळगिरी यांनी स्टॅलिन यांचा तीन महिन्यात मृत्यू होईल असे सांगितल्याचे करुणानिधी यांनी जाहीर केले. मात्र अळगिरी समर्थकांनी हा दावा फेटाळला.

करुणानिधी यांच्यासाठी स्टॅलिन हे अनेक वर्षांपासून विश्वासू होते. तसेच ते तरुण असल्यापासून पक्षातील अनेक पदे सांभाळत आहेत. ते पक्षाचे खजिनदार आणि युवा सेनेचे सचिव तीन दशकापर्यंत होते. मात्र या तुलनेत अळगिरी यांची बाजू कमजोर दिसत आहे.