|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सावधान, कर्करोग फैलावतोय!

सावधान, कर्करोग फैलावतोय! 

दिवसाकाठी सात ते आठ नवे रुग्ण प्लास्टिक, थर्माकोल, अजिनोमोटोवर बंदी आवश्यक

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढले असून दिवसाकाठी किमान 7 ते 8 रुग्णांची नव्याने त्यात भर पडत आहेत. वर्षाकाठी 600 ते 700 पेक्षाही जास्त रुग्ण कॅन्सरने दगावतात. वाढत्या कर्करोगाशी सामना कसा करायचा? हा गंभीर प्रश्न असून चुकीच्या पद्धतीने आहार, विहार, प्लास्टिक आणि थर्माकोलचा वाढता वापर, प्रदूषण, व्यसने आणि आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष ही प्रामुख्याने कॅन्सरची प्रमुख कारणे ठरलेली आहेत. हृदयरोगालाही मागे टाकण्यासाठी कॅन्सर आक्रमण करीत आहे.

राज्यात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक ती जनजागृती सरकार दरबारी होत नाही. दिवसाकाठी 7 ते 8 नवे कॅन्सर रुग्ण गोमेकॉमध्ये येत असल्याची कबुली आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. राज्यातील सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी वाढते कॅन्सर रुग्ण याबाबत चिंता व्यक्त केली, मात्र घाबरुन जाण्याची गरज नाही, असे निवेदन केले तर पतंजली व भारत स्वाभिमान गोवाचे प्रमुख कमलेश बांदेकर यांनी चुकीच्या सवयी आणि चुकीचा आहार यावर अगोदर प्रत्येकाने नियंत्रण ठेवावे. कर्करोगाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दररोज योग करणे सर्वाधिक लाभदायक ठरेल, असा दावा केला आहे.

मात्र घाबरण्याचे कारण नाही : डॉ. साळकर

मणिपाल इस्पितळाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर हे गोव्यातील नामवंत व तज्ञ आहेत. कॅन्सरवर ते उपचार करीत असतात. गोव्यात वर्षाकाठी 1 हजार ते 1200 नवे कॅन्सर रुग्ण तयार होतात. म्हणजेच दिवसाकाठी 3 ते 4 नवे रुग्ण आढळतात. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात हे प्रमाण कमी असल्याचा दावा डॉ. शेखर साळकर यांनी केला आहे.

गोव्यात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण 30 टक्के पेक्षा जास्त व्यक्ती रेड मीट खातात. तसेच सीलबंद आणि ज्यामध्ये पदार्थ टिकण्यासाठी जी रसायने वापरली जातात अशा पदार्थांचे सेवन विशेषतः पोर्क व तत्सम पदार्थांचे मोठय़ा प्रमाणात होत असलेले सेवन चुकीच्या पद्धतीने आहार सेवन करणे, सिगारेट वा तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाचे व्यसन आणि काही प्रमाणात हे वांशिक पद्धतीने आलेले रोगाचे घटक यामुळेही कॅन्सर होतो.

स्तन कर्करोगाचे प्रमाण युवा महिलांमध्ये वाढतेय!

डॉ. शेखर साळकर यांच्या मते महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने युवा महिलांमध्ये हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतेय. मात्र गर्भाशयाच्या मुखावर होणारा कर्करोगाच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वी स्तनावरील कर्करोगाचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक होते. ते नियंत्रणात येत आहे. मात्र युवा महिलांमध्ये हे प्रमाण वाढतेय.

अजिनोमोटोवर बंदी हवी

डॉ. शेखर साळकर यांच्या मते जनतेमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होत असलेले बदल हे कर्करोगाला निमंत्रण देणारे आहे. गाडय़ांवर, उघडय़ावर चमचमीत पदार्थ खाण्यासाठी अनेकजण धावतात, मात्र अलिकडे अनेक ठिकाणी एमएसजी अर्थात ‘अजिनोमोटो’ घालून खाद्यपदार्थांची रुची वाढविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. त्यामुळे कर्करुग्णांची संख्या वाढतेय. राज्य सरकारने ‘अजिनोमोटो’वर पूर्णतः बंदी घालणे आवश्यक आहे. बंदी घातल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही यासाठी यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे.

………………………………………………………………………………………………………..

एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की कर्करोगाच्या बाबतीत जनतेत जागृती होणे आवश्यक आहे. एकदम घाबरुन जाण्याची परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नसली तरी देखील आपण सर्वांनी जागृत राहाणे आवश्यक आहे.

 

योग करा! निरोगी रहा – डॉ. बांदेकर

पतंजलीचा गोव्यात प्रचार करणारे नामवंत योग प्रशिक्षक व भारत स्वाभिमानचे गोवा प्रमुख डॉ. कमलेश बांदेकर यांनी सांगितले की राज्यात दिवसेंदिवस कर्करुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. गोव्यात जास्तीत जास्त कर्करोग हे अन्नातील भेसळ व आहारशास्त्र न बाळगता चुकीच्या पद्धतीने तो घेण्यात येत असल्याने विशेषतः विरुद्ध सेवन जादा प्रमाणात करण्यात येत असल्याने कर्करुग्णांची संख्या वाढत आहे.

कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. कमलेश बांदेकर म्हणाले की, मोठय़ा प्रमाणात केवळ नवी पिढी वा युवा पिढीच असे नव्हे तर घरातील अनेक ज्येष्ठ मंडळी देखील पदार्थ टिकण्यासाठी जी काही रसायने वापरली जातात अशी पॅकबंद पदार्थांचे सेवन करीत असतात व हे पदार्थ आणि त्याबरोबर येणारी केमिकल्स पोटात जात असल्याने कर्करुग्णांची संख्या वाढतेय.

जर्सी गायीचे दूध? विचार करावा…

जर्सी गायीच्या दुधाचे उत्पादन वाढत आहे खरे, परंतु हे दूध आता आरोग्य बिघडविण्यास मदत करीत आहे. जर्सी गायींमधून सकस दूध येऊ शकत नाही. त्यांना केमिकलयुक्त खाद्यपदार्थ खायला दिले जातात व त्यातून निर्माण होणारे दूध हे अशा तऱहेच्या रुग्णांना निमंत्रण देणारे आहे. त्यामुळे गो-पालकांनी जास्तीत जास्त भारतीय गायी व म्हशींचा वापर दुग्धोत्पादनासाठी करावा, असे कमलेश बांदेकर म्हणाले. या व्यतिरिक्त रिफाईंड तेलांचा वापर आहारात केला जातोय ते टाळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आपल्याकडे अनेकजण चुकीच्या पद्धतीने आहार घेतात तसेच विरुद्ध आहारामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.

गोवा सरकारने थर्माकोल, प्लास्टिकवर बंदी घालणे आवश्यक आहे. यांचा वापर झाल्यानंतर ती जाळून टाकून त्यातून येणाऱया धुरामुळे कर्करुग्णांची संख्या वाढविण्याचे काम केले जात आहे. राज्य सरकारने हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असे कमलेश बांदेकर म्हणाले.

कर्करोग बरा होऊ शकतो

कमलेश बांदेकर यांनी एक दिलासाजनक निवेदन केले असून त्याद्वारे त्यांनी कर्करोग हा बरा होऊ शकतो असे म्हटले आहे. कर्करोग होऊ नये यासाठी प्रयत्न व्हावेत व त्यात विरुद्ध आहार टाळावे. चुकीच्या पद्धतीने आहार न घेणे याबरोबरच सर्वात मुख्य म्हणजे कर्करोग होऊ नये यासाठी प्राणायम करा. प्राणायममुळे प्राणवायूचे प्रमाण वाढते आणि त्यातून शरीरातील ज्या वापराविना पेशी मरु लागतात व त्यातून कर्करोग तयार होतो ती प्रक्रियाच बंद होईल. सर्व पेशी कार्यरत होतील व कर्करोग फिरकणार देखील नाही, असे बांदेकर म्हणाले.

कॅन्सरसाठी स्वतंत्र विभाग सुरु करतोय – विश्वजित राणे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी मान्य केले. गोमेकॉतच दिवसाकाठी 7 ते 8 नवे रुग्ण येतात. गोमेकॉमध्ये आता आम्ही स्वतंत्र विभाग सुरु करीत आहोत. गोमेकॉमध्ये सध्या तरी मोठय़ा प्रमाणात कर्करोगावरील सुविधा निर्माण करुन ठेवलेल्या आहेत, असे ते म्हणाले.

कॅन्सर हा सर्वात महागडा रोग ठरलेला आहे. आपली लाईफ स्टाईल बदललीय. शिवाय आपण घेत असलेल्या आहारातून अनेक घटक आपल्या शरीरात जातात व त्यातून कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. गोमेकॉमध्ये कॅन्सर रुग्णांना आवश्यक असलेली महागडी औषधे देखील आणून ठेवण्यात आलेली आहेत. पुढील दोन वर्षात गोमेकॉमध्ये कॅन्सरसाठी स्वतंत्र विभाग होईल. आता आम्ही वेगळा विभाग सुरु केलेला आहेच परंतु आता नव्याने इस्पितळासाठी इमारत उभारली जाईल. केंद्राकडून मदत घेऊन रु. 100 कोटी खर्चाचा सुसज्ज इस्पितळ प्रकल्प उभारला जाईल. याशिवाय आयुर्वेदिक औषधांचाही याकामी वापर केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.