|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » पुष्कर, सई स्टुपिड वाटतात : मेघा धाडे

पुष्कर, सई स्टुपिड वाटतात : मेघा धाडे 

पुणे / प्रतिनिधी :

बिगबॉसचा सिझन संपल्यावर सई लोकूर आणि पुष्कर जोग यांनी बाहेर येऊन ज्याप्रकारे मुलाखती दिल्या आहेत, ते बघितल्यावर ते मला स्टुपिड वाटतात, अशी खरमरीत टीका मराठी बिगबॉस कार्यक्रमाची विजेती मेघा धाडे हिने सोमवारी येथे केली. वरिष्ठ व कनिष्ठ भेदभाव जाणवल्याचेही तिने सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’ उपक्रमाच्या अंतर्गत त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. मेघा म्हणाली, सई आणि पुष्कर मला बाहेर आल्यावर फेक (खोटी) म्हणतात. मात्र, अशा कार्यक्रमात खोटे वागून चालत नाही, हे त्यांना माहीत नसावे. मी आहे तशी वागून विजेती झाले, ही गोष्ट त्यांना पचलेली नाही. मी त्यांच्याशी शेवटपर्यंत  मैत्री निभावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला समजून घेण्यात माझे मित्र कमी पडले. एकतर्फी मैत्री कधीच होऊ शकत नाही. भविष्यात आस्तादच चांगला मित्र राहील. पण पुष्कर राहणार नाही. रात्रंदिवस कॅमेऱयासमोर असताना कोणी शंभर दिवस अभिनय करणे अशक्य आहे.

हा शो म्हणजे माझ्या आयुष्यभराची कमाई असून, हा शो माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आयुष्यात संधी आली, की शंभर टक्के झोकून द्या. चांगले वाईट प्रसंग आले, तरी आपला सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पुढील आयुष्य जगत रहा, असा प्रेमळ सल्ला तिने दिला. शोच्या काळात मी घरात नसल्यामुळे कौटुंबिक नातेसंबध अधिक दृढ झाले. त्यामुळे आयुष्यात शोमुळे काही बदल होतो, असे नाही, तर तुम्ही कसे वागता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात, असेही तिने नमूद केले.