|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » यवतमाळमध्ये रंगणार 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

यवतमाळमध्ये रंगणार 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यवतमाळ येथील स्थळाच्या निवडीची अधिकृत घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र वाचनालय संयुक्तपणे आयोजन करण्यात आले आहे.

निमंत्रक संस्थांच्या निमंत्रणावरून महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने 5 ऑगस्ट रोजी यवतमाळला भेट दिली होती. संमेलनस्थळाची पाहणी केल्यानंतर समितीच्या बैठकीत या समितीने सर्वानुमते यवतमाळ येथील संमेलनस्थळाची शिफारस 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी महामंडळास केली होती.

महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. विद्या देवधर, डॉ. कार्यवाह इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे या पदाधिकाऱयांसह मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी, डॉ. दादा गोरे, विनोद कुळकर्णी आणि अनुपमा उजगरे यांचा समितीत समावेश आहे. या साऱयांनीच यवतमाळला भेट देऊन निमंत्रक संस्थाच संमेलन आयोजन क्षमता व सामर्थ्याविषयी तसेच संमेलनाशी संबंधित आवश्यक त्या सोयी, सुविधांबाबत आश्वस्त करून घेत स्थळाबद्दल समाधान व्यक्त केले होते.

संमेलनातील ग्रंथप्रदर्शन तसेच संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम ठरवून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महामंडळाच्या ग्रंथ प्रदर्शन समितीची सभा 26 ऑक्टोबर, संमेलन मार्गदर्शन समितीची सभा 27 ऑक्टोबर आणि महामंडळाची सभा 28 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथेच आयोजिण्यात आल्या असल्याचेही महामंडळाने कळविले आहे.