|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ठाण्यात खैर चोरी, कोलाडात कारवाई, सावर्डेत छापे

ठाण्यात खैर चोरी, कोलाडात कारवाई, सावर्डेत छापे 

लाकूड चोरी प्रकरणी इरफान खलपे ताब्यात

ठाणे-कोल्हापूर वनविभागाचे सावर्डे परिसरात धाडसत्र

मात्र, उत्पादकांकडे चोरीचा साठा नसल्याचे स्पष्ट

ठाणे वनक्षेत्रपाल भडाळेंविरोधात व्यावसायीक आक्रमक

वार्ताहर /सावर्डे

ठाणे जिह्यातील शासकीय जंगलातील खैराची चोरी केल्याप्रकरणी सावर्डे येथील इरफान खलपे याच्या ट्रकसह 16 टन खैर कोलाड येथे जप्त करण्यात आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाच्या ठाणे व कोल्हापूर येथील पाच पथकांनी सावर्डे, निवळी आणि पालवण येथील कात उत्पादकांवर बुधवारी छापे मारले. मात्र यात चोरीचा कोणताही लाकूड साठा आढळला नाही. दरम्यान, वारंवार त्रास देणाऱया ठाणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल विश्वास भडाळे यांच्याविरोधात व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने भडाळे यांना अखेर तेथून काढता पाय घ्यावा लागला.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील इरफान खलपे हा ठाणे येथील शासकीय जंगलातील खैर लाकूड एजंटच्या माध्यमातून सावर्डेच्या दिशेने घेऊन येत होता. हा ट्रक 9 ऑगस्ट रोजी ठाणे वनाधिकारी विश्राम भडाळे यांनी पाठलाग करून कोलाड येथे पकडला आणि खलपे यास ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 10 लाखांच्या 16 टन खैर लाकडासह ट्रक जप्त करण्यात आला. खलपेवर करण्यात आलेली गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी कारवाई असून त्याला ठाणे येथील जिल्हा न्यायालयात 16 ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले.

भडाळे यांनी काढता पाय घेतला!

दरम्यान, खलपे याला अटक केल्यानंतर त्याने यापूर्वी सावर्डे, निवळी येथील कात उत्पादकांना ठाणे शासकीय जंगलातील लाकूड दिल्याचे सांगितले. त्यामुळे कात उत्पादकांच्या चौकशीसाठी ठाणे येथील वनाधिकारी भडाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी छापे टाकले. मात्र ही कारवाई चुकीचे असल्याचे सांगत जिह्यातील दोन्ही कात उत्पादक संघटना आक्रमक झाल्या व ठाणे येथील वनाधिकारी भंडाळे यांच्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे सावर्डे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे भंडाळे यांनी तेथून काढता पाय घेतला.

सावर्डे, निवळी, पालवण येथे छापे

भडाळे यांच्याविरोधात व्यावसायिक आक्रमक झाल्याने अखेर ठाणे जिल्हा वनविभागीय दक्षता अधिकारी संतोष सस्ते यांच्यासह पाच कर्मचारी व कोल्हापूर विभागीय वनाधिकारी प्रकाश बागेवादी यांच्यासह पाच मोबाईल स्कॉड व 20 कर्मचाऱयांनी येथील सचिन पाकळे यांच्या सचिन कात इंडस्ट्रीज, गजानन लोकरे यांच्या गजानन कात इंडस्ट्रीज, मनोज डिके यांच्या यश कात इंडस्ट्रीज, महेंद्र सुर्वे यांच्या ओंकार कात इंडस्ट्रीज, सुजीत रेपाळ यांच्या रत्नसागर या पाच इंडस्ट्रीजवर छापे मारले. गेले दोन दिवस ही चौकशी सुरू आहे.

खलपेचे दोन्ही ट्रक कायमचेच जप्त

दरम्यान, इरफान खलपे याच्यावर करण्यात आलेली गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी कारवाई असून त्याचा यापूर्वी जप्त करण्यात आलेला एक व आताचा एक असे दोन ट्रक वनविभागाच्या ताब्यात आहेत. मात्र हे ट्रक शासनाच्या कायम कस्टडीत राहणार असून ते त्यांना परत केले जाणार नसल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

dभडाळे भ्रष्ट अधिकारी- सचिन पाकळे

ठाणे येथील वनाधिकारी भडाळे हे भ्रष्ट अधिकारी असून यापूर्वी पुणे येथील एका कारवाईत लाचलुचपत खात्याने त्यांना रंगेहात पकडल्याने ते निलंबित होते. सावर्डे परिसरात कात उत्पादकांकडून पैसे उकळण्याच्या हेतूने खोटय़ा कारवाईचा बडगा पुढे करून लाखो रुपयांची मागणी ते करीत असल्याचा आरोप कात उद्योजक सचिन पाकळे यांच्यासह कात संघटनेने ठाणे जिल्हा वनाधिकारी सस्ते यांच्याकडे केला.

भंडाळे यांच्या उच्छादाने हैराण

रत्नागिरी कात उत्पादन संघटनेच्या गजानन लोकरे यांनी या कारवाईबाबत बोलताना सांगितले की, येथील कात उत्पादक हे शासन नियमाला अधिन राहून पारंपरिक कात व्यवसाय करीत आहेत. जे लाकूड घेतले जाते ते पास घेऊन घेतले जाते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे येथील वनाधिकारी भंडाळे यांनी उच्छाद मांडला असून केवळ खोटे आरोप करून ते त्रास देत आहेत.

चौकशीअंती दोषी अधिकाऱयांवरही कारवाई- सस्ते

दरम्यान, ठाणे वनविभागाचे अधिकारी संतोष सस्ते यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, याप्रकरणी पाचजणांची चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करणार आहे. ठाणे येथील शासकीय जागेतील खैर लाकूड वनखात्याची गस्त असताना मोठय़ाप्रमाणात बाहेर कसे पडते, इथपर्यंत कसे येते याची चौकशी करणार असून यामध्ये दोषी आढळणाऱयांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरीतील कात उत्पादकांनी चोरटय़ा मार्गाने कोणी लाकूड विक्री करताना आढळल्यास वनखात्यास संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.

यापूर्वी 90 ट्रक लाकूड जिल्हय़ात

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हय़ात असलेल्या शासकीय जागेतील खैराच्या झाडांची तोड करून चोरटी वाहतूक केली जात आहे. यातील काही वाहने जप्त करण्यात आली असली तरी आतापर्यंत गेल्या सहा महिन्यांत 90 ट्रक खैराचे लाकूड जिल्हय़ात आलेले आहेत. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे.