|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » वाडेकरांच्या निधनामुळे अपरिमित हानी : सचिन

वाडेकरांच्या निधनामुळे अपरिमित हानी : सचिन 

वृत्तसंस्था/ मुंबई

माजी भारतीय कर्णधार, प्रशिक्षक अजित वाडेकर यांच्या निधनामुळे अपरिमित हानी झाली असल्याची प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली. वाडेकर यांचे दि. 15 रोजी दक्षिण मुंबईतील इस्पितळात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वाडेकरांना शेवटचा निरोप देण्यासाठी सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रक्टर, माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील, उमेश कुलकर्णी, पद्माकर शिवलकर, विनोद कांबळी आदी उपस्थित होते.

‘माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी देखील आहे. वाडेकर सर हे महान क्रिकेटपटू होते, इतकेच लोकांना ज्ञात होते. पण, महान क्रिकेटपटूबरोबरच ते महान व्यक्ती देखील होते, ते अनुभवता आल्याने मी स्वतःला सुदैवी मानतो. माझ्यासाठी ते विशेष महत्त्वाचे होते. मागील अनेक वर्षांच्या कालावधीत त्यांच्याशी असलेला स्नेह नेहमी वृद्धिंगतच होत राहिला होता’, असे सचिन पुढे म्हणाला.

वाडेकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवले गेले होते. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्या पार्श्वभूमीवर, सचिनने आपल्या कारकिर्दीला वाडेकर यांनी कसे वळण दिले, याचा उल्लेख केला.

‘वाडेकर सरांचे माझ्या कारकिर्दीत मोठे योगदान राहिले. मी अवघ्या 20 वर्षांचा होतो, त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. खरं तर त्या वयात भरकटण्यासारखे खूप काही असते. पण, वाडेकर सरांच्या कुशल मार्गदर्शनामुळे केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्यात मला यश आले. खेळाडू कोणताही असो, त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करवून घ्यायची, ही खुबी वाडेकर सरांच्याकडे होती. त्याचा माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना लाभ झाला. महान कर्णधार, प्रशिक्षक आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझे मित्र म्हणूनही त्यांच्याशी बराच स्नेह राहिला. कित्येकदा आम्ही क्रिकेटवर अगदी तासन तास गप्पा मारत असू. क्रिकेटच्या बैठकांमध्ये ते गंभीर असायचे. पण, डिनरसाठी सर्व जण एकत्र असताना ते मर्म विनोदी शैलीत असायचे. त्यामुळे, त्यांच्याप्रती सर्वांनाच जिव्हाळा असायचा’, अशा शब्दात सचिनने काही आठवणींना उजाळा दिला.

माजी यष्टीरक्षक व बीसीसीआय जीएम (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनीही वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘माझ्या वयाच्या जवळपास सर्व खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले. ते सर्वोत्तम डावखुरे फलंदाज होते. त्यांच्या जाण्याने अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे मोठे नुकसान झाले आहे’, असे ते म्हणाले. माजी क्रिकेटपटू समीर दिघे, माजी हॉकी कर्णधार एम. एम. सोमय्या, मुंबई क्रिकेट संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांनीही वाडेकरांना श्रद्धांजली वाहिली.