|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मोदीः आक्रमक की बचावात्मक

मोदीः आक्रमक की बचावात्मक 

आजमितीस मोदींसारखा तालेवार नेता कोणीच नाही हे खरे असले तरी निवडणुकीचा आखाडा वेगळा असतो. आडाखे वेगळे असतात. अन्यथा 2004 साली सोनिया गांधीनी वाजपेयींचा ‘फीलगूड’चा  फुगा कसा फोडला असता. मोदींनी चार वर्षात भरपूर सुधारणा केल्या असे ढोल वाजवले जात असताना  मोदींची पाटी किती भरली आहे-उत्तरे किती बरोबर आहेत. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने एक कालखंड संपला. त्यांचा राजकीय वारसा कोणाकडे जाणार? भाजपमधील उदारमतवादी समजले जाणारे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज मऊ झाले आहेत. जेटली यांची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यामुळे गेले दोन महिने ते विश्रांतीच घेत आहेत. तर लखनौच्या मुस्लीम तरुणाच्या हिंदू पत्नीला पासपोर्ट मिळण्याकरताच्या प्रकरणात स्वराज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर मोदीभक्तांनी त्यांचा समाचार घेतला. या भयंकर पद्धतीच्या समाचारामुळे सुषमाजी एवढय़ा हादरलेल्या आहेत की या घटनेला महिना उलटून गेला तरी त्या अजूनही सावरलेल्या नाहीत. भाजप गोटातील चर्चेनुसार त्या प्रचंड अस्वस्थ आहेत. अशावेळी अटलजींच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार किलोमीटर चालून वाजपेयी समर्थकांना योग्य तो संदेश दिलेला आहे. सोळा वर्षापूर्वी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वाजपेयींनी गुजरात दंग्यांच्या पार्श्वभूमीवर राजधर्म पालन करण्याची आठवण करून दिली हा आता इतिहास झाला.

गेल्या चार वर्षात एकामागून एक घोषणा केल्यानंतर आता मोदी सरकारचा कठीण काळ सुरू झालेला दिसत आहे. कारण एकीकडे रुपया गडगडला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती ‘न भूतो न भविष्यती’ अशाप्रकारे खालावली आहे. त्यामुळे तेलाचे भाव वाढणार आणि महागाईचे दुष्टचक्र अजून जोरात सुरू राहणार असे दिसत आहे. लोकसभा निवडणूक आठ महिन्यांवर आलेली असताना रुपयाचे असे गडगडणे हा शुभसंकेत नाही. मोदी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांना हा मुद्दा आयताच हाती आला आहे. 2013 साली रुपयाची किंमत घसरली होती तेव्हा मनमोहनसिंग सरकारातील भ्रष्टाचार हा पराकोटीला  पोचला आहे असा प्रचार करून मोदींनी काँग्रेसची पंचाईत करून ठेवली होती. आता रुपयाच्या स्थितीवर पंतप्रधानांनी ‘अळी मिळी गूप चिळी’ केलेली आहे.

        भाषणे कंटाळवाणी आणि लांबलचक

मोदी हे पट्टीचे वक्ते आहेत हे विरोधक देखील मान्य करतात. पण अलीकडच्या त्यांच्या भाषणात एकसुरीपणा वाढलेला आहे. त्यांची भाषणे कंटाळवाणी आणि लांबलचक होऊ लागली आहेत. त्यांच्या भाषणात उज्ज्वला योजना, ग्रामीण विद्युतीकरण, मुद्रा योजना, स्वच्छता अभियान हे मुद्दे परत परत येऊ लागले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच आपल्या सरकारने अशा योजना राबवल्या आहेत असे सांगून पंतप्रधानांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी त्यांना वातावरणात 2013 ची जादू आणता येत नाही. ‘मोदी’, ‘मोदी’ अशी आरोळी अलीकडच्या जनसभात पूर्वीसारखी झळकत नाही. 2022 पर्यंत सर्वांना घर मिळणार, शेतमालाचे भाव दुप्पट होणार वगैरे आश्वासने पहिल्यापासून दिली जात आहेत. त्याला लोक रूळले आहेत. नोटाबंदीचा गाजावाजा स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात क्रांतिकारी आर्थिक निर्णय असा केला जायचा. पण गेले दोन महिने ‘नोटाबंदी’ ही पंतप्रधान तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातून गायब झालेली आहे. वाजपेयींच्या आकस्मिक निधनामुळे पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. 2019 च्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटल्यावर ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ झालेला दिसत आहे. पंतप्रधानांच्या भाषणात जे मुद्दे आले नाहीत वा त्या प्रश्नांवर त्यांनी मौन पाळले त्यावरच विरोधी पक्षांची प्रचाराची मोहीम राहणार आह,s म्हणूनच राफेल फायटर जेट खरेदी प्रकरण येत्या काळात गाजणार आहे. विरोधकांना राफेलचे रूपांतर ‘बोफोर्स’ तोफ सौदा घोटाळय़ात करायचे आहे व येत्या काळात सर्वप्रकारे ते कामाला लागणार आहेत. राफेलच्या सौद्याचे समर्थन करण्याकरता भाजपने पल्लवी जोशींचा एक व्हीडिओ सादर करून ‘या खरेदीत सारे काही आलबेल आहे’ असा दावा केला आहे. पण सोशल मीडियावर या व्हीडिओची भरपूर टर उडवली गेली आहे. ‘दाल मे कुछ काला है’ ते ‘पुरी दाल काली है’ असे आरोप होत आहेत. फायटर विमाने ही तिप्पट किमतीला मोदी सरकारने विकत घेतली असा विरोधकांचा आरोप आहे. पण सरकार या विमानाची किंमत सांगायलाच तयार नाही म्हणून यातील गूढ वाढत आहे. हे प्रकरण झटक्मयात संपेल असे दिसत नाही. विरोधी पक्षांना देशहित कळत नाही अशा कांगाव्याने ते चिघळू शकते.

निवडणूक आयोगाचा झटका

दुष्काळात तेरावा महिना असाच काहीसा प्रकार सरकारबाबत गेल्या आठवडय़ात झाला. एका टीव्ही चॅनलने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणार असून भाजपचे पानिपत होणार आहे असा निर्वाळा दिलेला आहे. एका निवडणूक संशोधन संस्थेने केलेल्या सर्व्हेचे हे निष्कर्ष आहेत. ते किती चूक की बरोबर ते काळच दाखवेल पण या तिन्ही राज्यातील निवडणूक सोपी नाही याची कबुली भाजपाईच खाजगीत देतात. अशावेळी या तीन राज्यातील निवडणुका पुढे ढकलून त्या या वर्षअखेर घेण्याऐवजी मार्चमध्ये लोकसभा निवडणुका व इतर आठ राज्यांबरोबर घेण्याचा भाजपचा मानस होता. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा प्रकार घडला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ. पी. रावत यांनी असा प्रस्ताव साफ धुडकावून लावला आहे. सरकारची अशी योजना असेल तर पहिल्यांदा त्याबाबतचे घटना दुरुस्ती विधेयक संसदेने पारित केले पाहिजे असे स्पष्ट करून त्यांनी मोदींच्या योजनेत पाचर मारली आहे. जर काँग्रेस तीन राज्यात जिंकली तर लोकसभा निवडणुकीचे आडाखेच बदलावे लागतील असे जाणकार म्हणत आहेत. या सर्व्हेमध्ये मात्र राज्यातील निकालाचा लोकसभेवर परिणाम होणार नाही आणि मोदीच परत पंतप्रधान बनतील असा दावा केला आहे.

मोदींची जादू

प्रत्यक्षात परीक्षा तोंडावर आल्यावर पूर्ण अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांची जशी अवस्था होते तशी मोदींची झालेली दिसत आहे. आजमितीस मोदींसारखा तालेवार नेता कोणीच नाही हे खरे असले तरी निवडणुकीचा आखाडा वेगळा असतो. आडाखे वेगळे असतात. अन्यथा 2004 साली सोनिया गांधीनी वाजपेयींचा ‘फीलगूड’चा  फुगा कसा फोडला असता. मोदींनी चार वर्षात भरपूर सुधारणा केल्या असे ढोल वाजवले जात असताना फ्रान्सचे तरुण राष्ट्रपती मॅक्रान यांनी अवघ्या पंधरा महिन्यात जणू क्रांतीच केली आहे असे जाणकार सांगतात. मोदींची पाटी किती भरली आहे-उत्तरे किती बरोबर आहेत. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

सुनील गाताडे