|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » साखरप्यातील कौस्तुभ ठरतोय केरळी नागरिकांसाठी ‘देवदूत’

साखरप्यातील कौस्तुभ ठरतोय केरळी नागरिकांसाठी ‘देवदूत’ 

पुरग्रस्तासाठी कौस्तूभच्या टीमची अहोरात्र धडपड,

2 हजारांहून अधिक नागरिकांचे तारणहार

दीपक कुवळेकर /देवरुख

इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी…त्यात दरवाजाच्या बाहेर अतिविषारी कोब्रा…या दुहेरी संकटात घरामध्ये अडकलेलेले आठ कुटुंबीय… त्यापैकी एक अंथरुणाला खिळलेली वयोवृध्द महिला…हे कुटूंब मदतीसाठी जीवाच्या आकांताने टाहो फशेहत होते….. अशा परिस्थितीत साखरप्यातील कौस्तूभ फुटाणे या एन.डी.आर.एफ. जवानाने आपल्या सहकाऱयांसह जीवाची बाजी लावत या कुटूंबाला मृत्यूच्या दारातून वाचविले. हा प्रसंग आहे केरळ-अलाप्पुझामधील चेंगाणुर या ठिकाणचा… महापुराने सर्वांनाच हतबल केलेले असताना अनेक मदतीचे हात केरळावासियांचे आधशर बनले होते… त्यातलाच एक भक्कम हात होता साखरप्याच्या कौस्तुभचा. गेल्या पाच दिवसात कौस्तुभच्या टिमने 2 हजार पेक्षाही अधिक नागरीकांना पुराच्या वेढय़लतून सुरक्षित स्थळी हलवले आहे.

कुटूंबाला मदत करताना एन.डी.आर.एफ.ची टिम.

गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या जलप्रलयाने केरळमध्ये हाहाकार उडाला आहे. हजारों लोक महापूराच्या विळख्यात अडकले आहेत. एन.डी.आर.एफ.सह लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे जवान अहोरात्र नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत मदत व बचाव कार्य राबवत आहेत. या आपत्तीला आधार देण्यासाठी अनेक राज्य तसेच संस्था पुढे सरसावल्या आहेत. अजूनही मदतकार्य सुरुच आहे. एन.डी.आर.एफ.च्या एका तुकडीत साखरपा येथील कौस्तुभ फुटाणे हा युवक असून तो अहोरात्र जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवित आहे.

कौस्तूभने या बचाव कार्यातल्या अनेक आठवणी तरुण भारतकडे कथन केल्या. त्याने रविवारी घडलेले एक घटना सांगितली. अलाप्पुझामधील चेंगाणुर येथे मदतकार्य सुरु असताना एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक देण्यात आली. या इमारतीच्या बाजूला 12 फुट पाणी होते. पहिल्या मजल्याच्या दरवाजाच्यावर जवळपास एक फुट पाणी होते. तळमजल्यावर पाणी शिरल्याने हे कुटूंब पहिल्या मजल्यावर आले होते. या कुटेंबात महिला व पुरुष तसेच लहान मुले असे एकुण आठजण होते. त्यापैकी एका वयोवृध्द महिला अर्धांगवायूच्या झटक्याने अंथरुणालाच खिळून होती. या कुटूंबाच्या मदतीसाठी कौस्तूभ आपल्या सहकार्यांसह गेला खरा, पण दरवाजावर एक भलामोठा कोब्रा फणा वासून होता. प्रथम त्याच्याशीच सामना करावा लागणार होता.

या नागाला हटविण्यात बराचवेळ यश येत नव्हते. तो दरवाजातच आडवा होता. शेवटी कौस्तूभ व त्याच्या एका मित्राने थेट या कोब्रावरच काठीने हल्ला करत त्याला बाजूला केले. हा कोब्रा हटल्यानंतर त्यांनी त्या कुटूंबाची सुखरुप सुटका केली. या वयोवृध्द महिलेला कौस्तूभने स्वतः उचलून सुखरुप ठिकाणी आणले. कौस्तूभचे शिक्षण साखरपा व देवरुख येथे झाले आहे. वडीलांचे फोटोग्राफीचे दुकान आहे. कौस्तूभला लहानपणापासूनच सैनिक वा पोलीस होण्याची इच्छा होती. त्यानुसार कौस्तुभ सैन्यदलात दाखल झाला. प्रथम काही वर्ष त्याने काश्मीर सीमेवर काम केले. त्यानंतर 2016 मध्ये तो एन.डी.आर.एफ.मध्ये दाखल झाला.

केरळमध्ये उद्भवलेली परिस्थिती फार गंभीर आहे. त्याच आपण लांबून विचारही करु शकत नाही. आम्ही मदतीसाठी 16 ऑगस्टला सुरुवात केली. आतापर्यंत 2 हजार पेक्षा जास्त नागरीकांची आमच्या टिमने सुटका केली. रविवारी 12 ते 14 फुटापर्यंत पाणी होते. सोमवारी सायंकाळनंतर हळूहळू पाणी कमी होण्यास सुरुवात झाली असून आमचे मदतकार्य अहोरात्र सुरुच आहे.

कौस्तुभ फुटाणे, साखरपा.