|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाजपेयींचे अस्थिकलश आज, उद्या उत्तर गोव्यात फिरणार

वाजपेयींचे अस्थिकलश आज, उद्या उत्तर गोव्यात फिरणार 

प्रतिनिधी/ म्हापसा

भारतीय जनता पक्षातर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यानिमित्त उत्तर गोव्यात होणाऱया कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस हेमंत गोलतकर, गुरुप्रसाद पावसकर व म्हापशाचे नगरसेवक प्रँकी कार्व्हालो उपस्थित होते.

उत्तर गोव्यात होणाऱया कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना नाईक म्हणाले की, सकाळी पणजीहून अस्थिकलश पर्वरी साळगाव पीडीए कॉलनीमध्ये सकाळी 9 वा. दर्शनासाठी थांबणार आहे. त्यानंतर 10 वा. कळंगूट पोलीस स्थानकाजवळ, 10.45 वा. शिवोली मार्केट गणपती मंदिराजवळ, 12 वा. मांद्र पंचायतजवळ, 1 वा. विश्रांती होईल. दुपारी 2.30 वा. पेडणे जुने बसस्थानक, 4.30 वा. म्हापसा टॅक्सी स्थानक, 6.30 वा. थिवी मतदारसंघात कदंब बसस्थानक अस्नोडा येथे थांबून डिचोलीला रवाना होईल.

शुक्रवार दि. 24 रोजी सकाळी 10 वा. डिचोली हिरा मेमोरियल सभागृह, 11.15 वा. मये कारापूर तिस्क जंक्शन, 12 वा. सांखळी मार्केट पांगम दुकानाजवळ, 1 ते विश्रांती, 2 वा. वाळपई सभागृह, 3.30 वा. प्रियोळ देवकीकृष्णन मैदान माशेल, 4.30 वा. कुंभारजुवा गांधी चौक, नंतर जुनेगोवे रायबंदर पणजी, 5.15 वा. जेटी कॅप्टन ऑफ पोर्ट पणजी येथे अस्थिंचे विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिंचे विसर्जन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर आदी मंत्री, आमदार उपस्थित राहाणार आहेत, अशी दत्तप्रसाद नाईक यांनी दिली.

सिद्धूच्या पाकिस्तान सैन्यप्रमुख गळाभेटीचा निषेध

नवज्योतसिंग सिद्धू रविवारी पाकिस्तानच्या दौऱयावर गेले असता तेथे त्यांनी सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याने भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी त्या घटनेचा निषेध केला आहे. याबाबत आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व गोवा राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याबाबत भूमिका मांडावी असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखांच्या आदेशावरुनच सीमेवर गोळीबार होत असून त्यात आपल्या देशातील जवान शहीद होत असताना त्याच पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखाची गळाभेट घेणे हे अशोभनिय असून त्या वृत्तीचा निषेध करीत असल्याचे नाईक म्हणाले.