|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राजू गवळीसह डी मोरया गँगला मोक्काच्या हालचाली

राजू गवळीसह डी मोरया गँगला मोक्काच्या हालचाली 

प्रतिनिधी /सांगली :

  हनुमाननगर येथे गणेश बसाप्पा माळगे याचा खुनात अटक करण्यात आलेला राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी याला मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर या खुनातील तिघा संशयितांच्या पोलिसांनी  बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. धनंजय संजय गवळी (वय 22) आणि सचिन उर्फ संतोष संजय माळी (वय 20 दोघेही रा. हनुमाननगर चौथी गल्ली), पंकज चनाप्पा वाघमारे (वय 21 रा.शंभर फुटी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 मंगळवारी सायंकाळी पावणेसहा  वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर तिसरी गल्ली येथे गणेश माळगे या गुंडाचा  कोयत्याने हल्ला करून आणि डोक्यात दगड घालून  निर्घून खून करण्यात आला होता. मृत गणेश माळगे याचा मोठा भाऊ लक्ष्मण याने  विश्रामबाग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी, त्याचा पुतण्या धनंजय गवळी, सचिन गवळी, पंकज वाघमारे, प्रशांत गवळी, आदर्श वाघमारे, राहुल (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्यावर कट करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू गवळीला मंगळवारीच अटक करण्यात ंआली होती. मात्र अन्य हल्लेखोर पसार होते. बुधवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश पाटील पथकासह रात्रगस्तीवर असताना तिघे सशयित विश्रामबाग परिसरातच असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकून एका ठिकाणी बसलेल्या तिघांना अटक केली आहे.  माजी नगरसेवक राजू गवळीचा पुतण्या धनंजय गवळी याचा हनुमानगरनगर परिसरात डी मोरया नावाने ग्रुप आहे. गुन्हा दाखल असणारे सर्व डी मोरया गँगचे सदस्य आहेत.

 शंभर फुटी परिसरातील दादागिरी आणि गुन्हेगारी ही पोलीस आणि समाजासाठीही डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे कोणताही राजकीय अथवा अन्य दबाव सहन न करता ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी गणेश माळगेच्या खुनानंतर पोलीसांनी फिल्डींग लावली आहे. टोळय़ांतील वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली धुसफूस तसेच वर्चस्ववाद टिकवण्यासाठीच गणेश माळगेचा कट रचून खून केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी डी मोरया गँगच्या सर्वच सदस्यांची कुंडली तयार केली असून त्यांच्यावर मोक्क्का लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वीही या गँगच्या गुंडांवर विश्रामबाग पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या आक्रमक पावलामुळे सांगली शहराच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेक पांढरपेशी गुंडांनी सांगलीतून पलायन केले आहे.

Related posts: