|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » नेमबाजीत हिना सिध्दूला कांस्य

नेमबाजीत हिना सिध्दूला कांस्य 

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई स्पर्धेत शुक्रवारी भारताची स्टार नेमबाज हिना सिध्दूने 10 मी एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला. या प्रकारात युवा नेमबाज मनू भाकरला मात्र पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, नेमबाजातील भारताचे नववे पदक ठरले.

आशियाई स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी केल्यामुळे शुक्रवारी 10 मी एअर पिस्तूल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकर व हिना सिध्दू यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष्य होते. प्रारंभी, पात्रता फेरीत दोघींची खराब सुरुवात झाल्याने भारताच्या पदक मिळवण्याच्या आशा धुसर झाल्या होत्या. पण, हिनाने शेवटच्या फेऱयांमध्ये पुनरागमन करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत मात्र अपेक्षित कामगिरी न करता आल्याने तिला 219.2 गुणासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात, चीनच्या वांग कियानने 240.2 गुणासह सुवर्ण तर द.कोरियाच्या किम मिनजिंगने 237 गुणासह रौप्यपदक जिंकले.

या प्रकारात युवा नेमबाज मनू भाकरला पुन्हा एकदा अपयश आले. तिला 176.2 गुणासह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या या स्टार खेळाडूला 25 मी पिस्तूल प्रकारातही चांगली कामगिरी करता आली नव्हती. हिना सिध्दूचे मात्र आशियाई स्पर्धेतील तिसरे पदक ठरले. याआधी, तिने 2010 व 2014 मध्ये 25 मी पिस्तूल प्रकारात कांस्य जिंकले होते.

Related posts: