|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एटीएसच्या रडारवर आणखी दहाजण

एटीएसच्या रडारवर आणखी दहाजण 

प्रतिनिधी/ सांगली

 एटीएसने सांगली जिल्हय़ात सुरू केलेल्या छापासत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी तासगावमधील दोघांना चौकशीसाठी उचलण्यात आले असले तरी आणखी दहा ते बारा जण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करणाऱया यंत्राणांचे लक्ष सांगली जिल्हय़ावर केंद्रीत झाले आहे.

  गुरूवारी एटीएसच्या पथकाने सांगली जिल्हय़ात अनेक ठिकाणी छापे टाकले. तासगावमध्ये एका संस्थेच्या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले असल्याची  जोरदार चर्चा जिल्हय़ात सुरू आहे. पण, तपास यंत्रणांनी तपासबाबत गोपनीयता पाळली असल्याने कोणतीही अधिकृत माहिती बाहेर पडू शकत नाही. इतकेच नाही तर स्थानिक पोलिसांनाही याबाबत तपास यंत्रणा कोणताच सुगावा लागू देत नाहीत. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे.

 तासगाव येथील दोघा युवकांना गुरूवारी तपासासाठी ताब्यात घेऊन एटीएसचे पथक रवाना झाले. हे दोघेही युवक सनातन संस्थेचे साधक असल्याची चर्चा सुरू आहे.पण त्यांना कोणत्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुरोगामी विचारवंतांच्या हत्येमध्ये त्यांचा नेमका काय सहभाग आहे. याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आतापर्यत हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या गुन्हय़ांचे लोण सांगलीपर्यंत पोहोचले आहे. काही वर्षापूर्वी झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटाचे धागेदोरे सागंली आणि जत तालुक्यापर्यंत पोहोचले होते. सांगलीच्या गावभागातही या प्रकरणी काही जणांची चौकशी यंत्रणांनी केली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकजण अद्याप पोलीसांना सापडलेला नाही. तर मिरजेतही या प्रकरणाचे धागेदोरे असल्याच्या संशयावरून तपास यंत्रणांनी सांगलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

सांगली कनेक्शन दुर्दैवी : डॉ. बाबुराव गुरव

 पुरोगामी संघटनांचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी या कनेक्शनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सांगली जिल्हय़ात पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन प्रवाह पूर्वीपासूनच आहेत. हा विचारांचा संघर्ष आहे. विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे. याशिवाय परस्परांच्या विचारांचा सन्मान करायला हवा. सांगली जिल्हय़ात काही दहशतवादी पध्दतीने कृत्य करणाऱया संघटना आहेत. बहुजन समाजातील युवक त्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे बहुजनांचीच मुलं बहुजन समाजातील कार्यकर्त्यांविरोधात वापरण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही डॉ. गुरव यांनी शुक्रवारी सांगलीत बोलताना केला.

 आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही व्यवस्थेत संविधानाचाही आदर केला पाहिजे. पण, दिल्लीत एकाने संविधनच जाळले. अशा घटना रोखण्यात पोलीस आणि सरकार कमी पडत असल्याचा आरोपही डॉ. गुरव यांनी केला. अशा कृती करणारे मोठे जाळे कार्यरत आहे. पोलिसांनी ते जाळे मुळापासून खणून काढण्याची मागणी त्यांनी केली.

 पण गोवा बॉम्बस्फोट, डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे यांच्या हत्यांमध्ये सांगलीचे कनेक्शन येणे हे दुर्दैवी असल्याची मतही त्यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना  व्यक्त केले  आहे. मात्र यंत्रणांकडून या सर्व प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 एटीएसकडून सतर्कतेच्या सूचना

या सर्व पार्श्वभूमिवर पुरोगामी नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आपल्यालाही पोलीस संरक्षण आहे. पण, काही शंकास्पद आढळल्यास अथवा काही अडचण असल्यास संरक्षणावरील पोलीसांमार्फत आपल्याला तात्काळ माहिती द्या. सतर्क राहा अशा सूचना एटीएसने दिल्या असल्याची माहितीही डॉ. गुरव यांनी यावेळी दिली.