|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘ट्रायबल सब-स्कीम’खालील प्रस्ताव पालिका संचालकांकडे धूळ खात

‘ट्रायबल सब-स्कीम’खालील प्रस्ताव पालिका संचालकांकडे धूळ खात 

प्रतिनिधी/ मडगाव

केंद्राच्या ‘ट्रायबल सब-स्कीम’च्या अंतर्गत मडगाव पालिकेने सुमारे 48 लाख रुपयांची विकासकामे राबविण्यासाठीचा प्रस्ताव पालिका संचालकांना पाठविलेला आहे. मात्र गेले चार महिने सदर प्रस्ताव पालिका संचालकांच्या कार्यालयात धूळ खात पडला आहे. या प्रकाराबद्दल मडगाव पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष टिटो कार्दोज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातींचा समावेश असलेल्या प्रभागांत विकासकामे राबविण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. दरवर्षी अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यात येत असते. राज्यातील सर्व 11 पालिकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची विकासकामे राबविता येतील अशा प्रकारे ही तरतूद करण्यात येत असते. मात्र बहुतांश वेळा अनुसूचित जमातींसाठी असलेल्या या निधीचा वापर करण्यात येत नसल्याने तो परत सरकारच्या तिजोरीत जात असल्याचे आढळून आले आहे.

मागील आर्थिक वर्षात आपण आपल्या प्रभागात सुमारे 19.50 लाख रुपयांची विकासकामे या योजनेच्या अंतर्गंत मार्गी लावली होती. अशा प्रकारे या निधीचा विनियोग करणारे राज्यातील आपण बहुदा पहिलेच नगरसेवक असावेत, असा दावा कार्दोज यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. तरी असता लेखापरीक्षकांनी मागील वर्षी अनुसूचित जमातींसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर करण्यात आला नसल्याचा ठपका मडगाव पालिकेवर ठेवला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

योजनेसाठी पात्र प्रभाग घेतले होते जाणून

सदर निधीचा विनियोग करण्याची प्रक्रिया ही सरळ सोपी नसून ती काहीशी किचकट असल्याचे कार्दोज यांनी नजरेस आणून दिले. या योजनेच्या अंतर्गत एखाद्या प्रभागात काम हाती घेण्यासाठी तेथे 80 टक्के अनुसूचित जमातींची लोकसंख्या असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आम्ही यंदा पालिका संचालकांना एक पत्र लिहून मडगाव पालिकेचे कोणते प्रभाग अनुसूचित जमातींसाठीच्या या योजनेंतर्गत कामे मार्गी लावण्यासाठी पात्र आहेत त्याची विचारणा केली होती.

मडगाव पालिकेचे प्रभाग 1, 2, 3 व 9 हे सदर विकासकामे हाती घेण्यासाठी पात्र असल्याचे पालिका संचालकांकडून स्पष्ट करण्यात आल्यावर चारही प्रभागांमध्ये नाला उभारणी, पेव्हर्स बसविणे, पदपथ तयार करणे अशा प्रकारची एकूण आठ विकासकामे राबविण्याचा प्रस्ताव पालिकेने यंदा एप्रिलमध्ये पालिका संचालकांना पाठवून दिला होता. मात्र अजूनही त्यास मंजुरी मिळालेली नसून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे कार्दोज यांनी नजरेस आणून दिले.