|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘महसूल’चा अनधिकृत चिरेखाण व्यवसायाला दणका

‘महसूल’चा अनधिकृत चिरेखाण व्यवसायाला दणका 

असरोंडीतील चौघांवर, चौकेत एकावर कारवाई : लाखो रुपयांचे साहित्य ताब्यात : डंपर, जेसीबी, ट्रिलर, जनरेटरसह मशिनरी सील : दिवसभराच्या कारवाईने अनेकांची पळापळ : यापुढेही कारवाई सुरूच राहणार-मालवण तहसीलदार

प्रतिनिधी / मालवण:

बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक व्यवसायातील खोलवर रुतलेली पाळेमुळे खणून काढल्यानंतर मालवणचे तहसीलदार समीर घारे यांनी आपला धडाका अनधिकृत चिरेखाणीतील उत्खनन व वाहतूक व्यवसायाकडे वळविला. तालुक्यात अनधिकृत चिरेखाण व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी महसूलची पथके नियुक्त करीत एकाचवेळी असरोंडीतील चार आणि आंबेरीतील एका चिरेखाणीवर धडक दिली. पाचही ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे तपासणीत दिसून आल्याने जागेवर मिळालेली सर्व मशीन आणि डंपर, गाडय़ांवर कारवाई करण्यात आली.

मालवण तालुक्यातील असरोंडी आणि आंबेरी येथे अनधिकृतपणे गौण खनिज अर्थात जांभा दगडाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार घारे यांनी कारवाई करीत लाखो रुपयांची मशिनरी सील केली. असरोंडीत राजेश सावंत, संदीप सावंत, नयन राणे, विनायक मेस्त्राr या चौघांवर, तर आंबेरीत सागर गोवेकर याच्यावर कारवाई करण्यात आली. यातील काहींच्या चिरेखाणीची परवानगी संपलेली होती, तर काहींनी परवानगी असलेल्या जागेव्यतिरिक्त दुसऱया जागेत उत्खनन केल्याचे दिसून आले. महसूलच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत चिरेखाण व्यवसाय करणाऱयांची पळता भुई थोडी झाली आहे. कारवाईत मंडळ अधिकारी एस. पी. हंगे, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी दिनेश तेली, सी. एम. कांबळे, एस. पी. मालवणकर, पी. डी. मसुरकर तसेच अन्य तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.

नोटीस काढून दंडात्मक कारवाई

 परवानगी नसताना बेकायदेशीरपणे चिरेखाण व्यवसाय केल्याप्रकरणी पाचहीजणांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे घेण्यात येणार आहे. नोटिसीवर आपली बाजू मांडण्याच्या संधीनंतर सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व साहित्य सील करून जागेवरच मालकाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. यातील साहित्य गायब झाल्यास संबंधित मालकांवरच कार्यवाही होणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाचपट दंडाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार घारे यांनी स्पष्ट केले.

कामगारांवरही होणार कारवाई

अनधिकृत चिरेखाण व्यवसायाच्या ठिकाणी सापडलेल्या सर्व कामगारांची माहिती घेण्यात आली आहे. या कामगारांवरही शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार आहे. सर्व कामगारांची माहिती पोलिसांत देण्यात येणार आहे. चिरेखाण अनधिकृत असताना तेथे काम केल्याबद्दल सर्व कामगारांनाही कारवाईस सामोरे जावे लागणार आहे, असेही महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धडक कारवाई अन् पळापळ

महसूल विभागाने असरोंडी, आंबेरी येथे केलेल्या धडक कारवाईमुळे अनधिकृत चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. तहसीलदार घारे यांनी एकाचवेळी अनेक टिम तयार करून असरोंडीतील चिरेखाण व्यवसायातील सर्वच अनधिकृत खाणींवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे कारवाईपासून सुटका होण्यासाठी अनेकांची पळापळ झाली होती. मात्र, तहसीलदारांनी सर्व साहित्य सील करीत पंचयाद्या घातल्या.

लाखो रुपयांचे साहित्य

महसूलच्या कारवाईत सील करण्यात आलेले साहित्य हे लाखो रुपयांचे असल्याने त्याच पटीत दंडाची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे तालुक्यात अनधिकृत चिरेखाण व्यवसाय करण्याची ताकद कोणाची होणार नाही. शासनाच्या नियमानुसार व्यावसायिकांनी बंधने पाळणे आवश्यक आहे. मात्र, महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱयांची नजर चुकवून बिनधास्तपणे अनधिकृत व्यवसाय करणाऱयांवर कारवाई सुरूच राहणार आहे, असेही घारे यांनी स्पष्ट केले.

सूचनांकडे दुर्लक्ष अन् कारवाई

महसूल विभागाने वाळू आणि चिरेखाण व्यावसायिकांना वारंवार अनधिकृत व्यवसाय करू नका म्हणून सूचना केल्या होत्या. त्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत अनधिकृत व्यवसाय सुरू ठेवलेल्या सर्वांवर महसूल विभाग कायदेशीर कारवाई करणार आहे. शासनाचा महसूल चुकविणाऱयांना धडा शिकविण्यात येणार आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार आहे, असे घारे यांनी स्पष्ट केले.

असरोंडी : 1. महसूल विभागाने कारवाई करीत अनधिकृत चिरेखाण व्यवसायातील जेसीबी सील केला.
(2)(3)(4) महसूल विभागाने कारवाई करीत अनधिकृत चिरेखाण व्यवसायातील डंपर सील केले आहेत.

सील करण्यात आलेले साहित्य

राजेश मधुकर सावंत (असरोंडी) – दोन ट्रिलर, 1 जेसीबी, 1 आडवी मशीन, चार डंपर

संदीप रामचंद्र सावंत (असरोंडी) – एक आडवी मशीन, कटर

नयन भास्कर राणे (असरोंडी) – एक आडवी मशीन, दोन ट्रिलर, एक डंपर

विनायक भालचंद्र मेस्त्राr (असरोंडी) – आडवी मशीन, ट्रिलर, कटर, डंपर

सागर चंद्रकांत गोवेकर (आंबेरी) – जेसीबी, जनरेटर, 120 ब्रास जांभा दगड