|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण?

संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण? 

मुस्लीम ब्रदरहुडशी केली होती तुलना : संघाच्या कार्यक्रमाचे अनेकांना असणार निमंत्रण

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लीम ब्रदरहुड या मुलतत्ववादी संघटनेशी तुलना करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना प्रत्युत्तर म्हणून संघ स्वतःच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण पाठवू शकतो. 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱया कार्यक्रमासाठी संघ अनेक विरोधी नेत्यांना आमंत्रण देणार आहे. या कार्यक्रमात अनेक राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील तज्ञांना बोलाविले जाईल, अशी माहिती संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी दिली.

राहुल गांधी मागील काही काळापासून सातत्याने संघाला लक्ष्य करत आहेत. जर्मनीनंतर ब्रिटनच्या दौऱयावर पोहोचलेल्या राहुल गांधींनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना संघावर प्रखर टीका केली होती. या टीकेच्या पार्श्वभूमीवर संघाकडून त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. संघ स्वतःच्या कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील तज्ञांना बोलाविणार असून यात राजकीय तसेच प्रसारमाध्यमातील चेहऱयांचा समावेश असेल.

भारतच न समजणारा…

राहुल गांधी यांच्या मुस्लीम ब्रदरहुड संदर्भातील विधानावर संघाने प्रतिक्रिया दिली आहे. जो व्यक्ती अद्याप भारताला समजू शकलेला नाही, तो संघाला कसा समजून घेईल. माहितीच्या अभावी काँग्रेस अध्यक्ष अशी तुलना करत असल्याचे संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी म्हटले. संघाच्या कार्यक्रमासाठी राहुल यांच्यासोबतच माकप महासचिव सीताराम येचुरी यांनाही निमंत्रण मिळू शकते.

प्रणव मुखर्जी, रतन टाटा सहभागी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी देखील संघाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. जून महिन्यात नागपूर येथे आयोजित संघाच्या कार्यक्रमात मुखर्जी सहभागी झाले. तर 24 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात रतन टाटा यांनी हजेरी लावली होती.