|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दारु दुकानाविरोधात संतीबस्तवाडच्या महिलांनी दंड थोपटले

दारु दुकानाविरोधात संतीबस्तवाडच्या महिलांनी दंड थोपटले 

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि अबकारी खात्यालाही निवेदन

 प्रतिनिधी / बेळगाव

ग्राम पंचायतीची परवानगी न घेता अचानकपणे एमएसआयएल दारु दुकान संतीबस्तवाड गावामध्ये सुरु करण्यात आली. त्याविरोधात संतीबस्तवाडची जनता एकवटली असून महिलांनी तर जोरदार विरोध केला आहे. तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन दारु दुकानाला आपला विरोध असून तातडीने तेथील दुकान बंद करावे, अशी मागणी महिलांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. त्यानंतर अबकारी खात्याकडेही निवेदन देवून ही मागणी केली आहे.

संतीबस्तवाड गाव हे शेतकरी व कामगारांचे गाव आहे. या गावामध्ये आजपर्यंत दारु दुकान नव्हते. यामुळे महिलावर्ग सुरक्षित होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानकपणे एमएसआयएल दारु दुकान सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता तरुणवर्ग व नागरिक व्यसनाधिन बनणार आहेत. त्यामुळे ते दुकान तातडीने बंद करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सध्या या गावामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. शेतकरी व कामगार आपल्या व्यवसायामध्ये गर्क आहेत. तर महिला आपल्या संसारामध्ये समाधानी आहेत. असे असताना अचानकपणे गावात दारु दुकान सुरु करुन साऱयांचे संसारच उद्धस्त करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या दारु दुकानामुळे मारामारी वाढणार आहेत. याचबरोबर त्या परिसरातून ये-जा करणेही जिखरीचे बनणार आहे.

दारु दुकान सुरु करताना वास्तविक ग्राम पंचायतीची परवानगी घेणे गरजेचे आहे. पण कोणतीही परवानगी नसताना तसेच ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे हे दारु दुकान सुरु करण्यात आले आहे. तातडीने हे दुकान बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी दिला आहे. यावेळी ग्रामस्थांनी व महिलांनी जोरदार घोषणाबाजी देवून दारु दुकानाला विरोध दर्शविला आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मी अंकलगी, ग्राम पंचायत सदस्य रामा गणपा पाटील, द्यामण्णा नाईक, लक्ष्मी दावतार, ऍड. प्रसाद सडेकर, ऍड. शंकर चन्नीकुप्पी, सुजाता मराठे, लक्ष्मी हलगेकर, रत्नव्वा सिध्दण्णावर, सविता गुंडोजी, लक्ष्मी माळी, पार्वती मुतगी, शांता हंपण्णावर, जब्बार ताशिलदार, यल्लाप्पा कर्लेकर, यासीन शेख, प्रकाश नाईक, यल्लाप्पा मच्छेदार, परशराम कर्लेकर, भगवान हलगेकर, मेघो बिर्जे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: