|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वच्छ सर्वेक्षण प्रतिक्रियांसाठी अभियान

स्वच्छ सर्वेक्षण प्रतिक्रियांसाठी अभियान 

जिल्हय़ातील ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण पूर्ण : 13 हजार 500 ऑनलाईन प्रतिक्रिया : 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ : गावांचा होणार सन्मान

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा कायम स्वच्छतेबाबतीत अग्रेसर राहिला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हावासियांच्या प्रतिक्रियाची नोंदविण्याकरिता 29 ऑगस्ट रोजी एक दिवशीय अभियान घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यानी दिली आहे. 

सिंधुदुर्ग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्यातील 340 गावांत हे सर्वेक्षण होणार असून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हय़ांतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असून जिल्हय़ातील ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱया जिल्हय़ांना 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

 स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये देशभरातील सर्व 698 जिल्हे सहभागी झाले आहेत. उत्कृष्ट काम करणाऱया जिल्हय़ाची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली (आयएमआयएस) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्हय़ातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱया सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणांची आकडेवारी ग्राहय़ धरली जाणार आहे. यामध्ये हागंदारीमुक्त गावांची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणी अंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धर्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहेत.

जिल्हय़ातील ग्रामस्थांच्या ऑनलाईन प्रतिक्रियांची नोंद करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी जिल्हाव्यापी एक दिवशीय अभियान घेण्यात येणार आहे. जिल्हय़ातील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना या ऑनलाईन ऍपबाबत माहिती देणार आहेत. जिल्हय़ातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ, जिल्हावासियांनी ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन रणदिवे यांनी केले आहे.

13 हजार 500 जणांनी नोंदविली प्रतिक्रिया

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणसाठी स्वच्छतेविषयक सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 13 हजार 500 नागरिकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली आहे. परंतु इतर जिल्हय़ाच्या मानाने खूपच प्रतिक्रिया नोंदविणारे लोक या जिल्हय़ात आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्हय़ात 84 हजार नागरिकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील लोकांनीही ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदवावी आणि स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये पुन्हा एक नंबरवर आणावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.