|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला

सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला 

तीन महिन्यांत 2,948 मिमीच्या सरासरीने पाऊस : सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. 30 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या 24 तासांत 22 मिमीच्या सरासरीने पाऊस पडला. तर पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2918 मिमीच्या सरासरीने एकूण 23,347 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद सावंतवाडी तालुक्यात 3,222 मिमी झाली आहे.

यावर्षी पाऊस सुरू झाल्यापासून खंड न पडता सातत्याने पडत आहे. शेतीसाठीही समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, गेले पंधरा-वीस दिवस काहीशी विश्रांती घेतल्याने पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आणखी एक दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

…तर पाऊस 4000 मिमीची सरासरी गाठणार

सिंधुदुर्गात 1 जूनला पाऊस सुरू झाल्यापासून गेले तीन महिने सातत्यपूर्ण पावसामुळे 2,918 मिमीच्या सरासरीने आतापर्यंत पाऊस झाला आहे. हे सातत्य कायम राहिल्यास पावसाळा संपेपर्यंत पाऊस 4,000 मिमीची सरासरी गाठण्याची शक्यता आहे.

सर्वात कमी पाऊस मालवण तालुक्यात

दरम्यान, आतापर्यंत तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता, सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 3,222 मिमी एकूण पाऊस, तर मालवण तालुक्यात सर्वात कमी 2,495 मिमी एकूण पाऊस झाला आहे. तसेच दोडामार्ग-2839, वेंगुर्ला- 2601, कुडाळ-2799, कणकवली-3174, देवगड-3007 आणि देवगड 3209 मिमी एवढा एकूण पावसाची नोंद झाली आहे.