|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘केसरी’ने केले सावंतवाडीकरांना तृप्त

‘केसरी’ने केले सावंतवाडीकरांना तृप्त 

सव्वाशे वर्षे अखंड पाणीपुरवठा : संस्थानकालीन योजना : सुधारित 45 कोटींचा आराखडा लवकरच मंजूर

विजय देसाई / सावंतवाडी:

शहरात नळाद्वारे केसरीतून पाणी आणून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याच्या घटनेला सव्वाशे वर्ष पूर्ण झाली आहेत. सावंतवाडी संस्थानकाळात ही योजना सुरू झाली असून ती सव्वाशे वर्ष अखंडितपणे सुरू आहे. बिरोडकर टेंबजवळील चिवारटेकडीवर संस्थानकाळात उभारलेल्या 16 बाय 16 लांबी-रुंदी आणि खोलीच्या टाकीत पाणीसाठा करून हा पाणीपुरवठा होतो. वाढत्या लोकसंख्येमुळे कुणकेरी पाळणाकोंड येथे शासनाने 1982 ला धरण बांधून जादा पाणीपुरवठा सुरू केला असला तरी केसरीतील संस्थानकालीन पाणी योजनेतून नेहमीच पाणीपुरवठा होता. गॅलन ते लिटर्स असा प्रवास असलेली ही नळयोजना शहरासाठी वरदान ठरली आहे.

दरम्यान, सावंतवाडी शहराची भविष्यकाळातील लोकसंख्या लक्षात घेऊन पालिकेने सुधारित नळपाणी योजनेचा 45 कोटी रुपयांचा आराखडा बनाविला असला तरी संस्थानकालीन नळयोजना रोल मॉडेलच आहे. शहरातील सुधारित नळयोजनेच्या 45 कोटी रुपयांच्या आराखडय़ाला सहा महिन्यात मंजुरी मिळेल. त्यातून पाईपलाईन बदलणे, नवीन टाक्या बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

केसरी नळयोजनेच्या कामाला सावंतवाडी संस्थान काळात डिसेंबर 1890 मध्ये सावंतवाडीचे संस्थानचे पोलिटिकल सुपरिटेंडंट कर्नल ए. एम. फिलिप्स यांच्या काळात सुरुवात झाली. त्यानंतर सहा जुलै 1893 ला सावंतवाडी संस्थानचे पोलिटिकल सुपरिटेंडंट कर्नल एच. एल. नर यांच्या काळात ही नळयोजना पूर्ण झाली. यंदा या नळयोजनेचे पाणी शहरात येण्याच्या घटनेला सव्वाशे वर्ष पूर्ण झाली. केसरीतून सुमारे 15 कि. मी. अंतरावरून नैसर्गिक गुरुत्वाकर्षणावर आधारित या नळयोजनेचे पाणी शहरात आणले गेले. सव्वाशे वर्षे अखंडितपणे हे पाणी शहराला पिण्यासाठी पुरविले जात आहे.

90 हजर गॅलन ते पाच लाख लिटर

नळयोजनेसाठी चिवार टेकडीवर 16 बाय 16 फूट लांबी-रुंदी आणि खोलीच्या टाकीत हे पाणी साठवून शहराला पुरविले जाते. त्यावेळच्या परिमाणानुसार केसरीतून शहराला 90 हजार गॅलन पाणी येत होते. तर बदललेल्या परिमाणानुसार दररोज पाच लाख लिटर्स पाणी येते. भिडय़ाच्या पाईपमधून केसरीतून हे पाणी चिवारटेकडीतील पाण्याच्या टाकीत सोडण्यात आले. हीच नळयोजना डोळय़ासमोर ठेवून नंतर शासनाने गुरुत्वाकर्षणावर आधारित नळयोजना कुणकेरी येथे पाळणेकोंड धरण बांधून सुरू केली. या धरणात 10085 मिलियम क्युबिक मीटर पाणीसाठा होतो. तर धरणातून शहराला 30 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. गतवर्षी पाळणेकोंड धरणाची उंची एक मीटरने वाढविली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात बाहेरचावाडा, मोरडोंगरी, समाजमंदिर, शिल्पग्राम या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बाधून शहराला 24 तास पाणी देण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

विनाखर्चाची योजना

शहरातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. यादृष्टीने सुधारित नळयोजनेचा आराखडा बनविण्यात आला. त्यात पाळणेकोंड धरणातून येणाऱया पाईपलाईन बदलण्यात येणार आहेत. शासनाने 1982 ला बांधलेल्या धरणाच्या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला गळती लागली. मात्र, सव्वाशे वर्षांच्या केसरीतील नळयोजनेला फारसा खर्च नगरपालिकेला करावा लागला नाही. ही योजना शहरासाठी वरदान ठरली आहे. पालिकेने गतवर्षी 32 लाख रुपये खर्च करून केसरीतील नळपाणी योजनेचा बंधारा दुरुस्त केला. त्यामुळे पाणीसाठा दहा लाख लिटरने वाढला आहे. नवीन पाईपलाईन घातल्यास शहराला केसरीतून पाच लाख लिटर दररोज जादा पाण्याचा पुरवठा होऊन एकूण 10 लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे, असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.

जादा पाणीपुरवठय़ाचे नियोजन

सावंतवाडी शहराला आज मुबलक पाणीपुरवठा होत आहे. शहराची लोकसंख्या 25 हजार आहे. सध्या या लोकसंख्येला पुरेल असा पाणीसाठा आहे. मात्र, भविष्यातील (2040) लोकसंख्या लक्षात घेऊन जादा पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करण्याची मुहूर्तमेढ सव्वाशे वर्षांपूर्वी झाली होती. नळयोजनेच्या पाण्यामुळे शहरातील लोकांचे आरोग्य  वाढण्याचा उल्लेख ऐतिहासिक पुस्तकात आढळतो. त्यामुळे भविष्यातील नियोजन लक्षात घेता हा संदर्भ महत्वपूर्ण असून त्यादृष्टीने केसरी नळयोजनेचे महत्व सव्वाशे वर्षानंतरही अधोरेखित होते.