|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर

सावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर 

आंबेनेळी दुर्घटना प्रकरण लोगो

मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय

नातेवाईकांचा विद्यापीठावर मोर्चा

प्रतिनिधी /दापोली

आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढून अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. अखेर नातेवाईकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून विद्यापीठाने सावंत-देसाई यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोशाने बुधवारी सुमारे तीन तास विद्यापीठ परिसरात तणाव होता.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱयांची बस महाबळेश्वरनजीकच्या आंबेनळी घाटात दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, बसमधील प्रकाश सावंतदेसाई हे आश्चर्यकारकरित्या वाचले होते. या प्रकाराबाबत मृतांच्या नातेवाईकांचा संशय व्यक्त केला आहे. अशा अपघातातून केवळ चालकच वाचू शकतो असे सांगत सावंत देसाई यांच्या बचावण्यावर नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे.

आमदारांसह अनेक नेते उपस्थित

मृतांच्या नातेवाईकांना विद्यापीठात अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरीत रूजू होणाऱया मृताच्या नातेवाईकांच्या समोर प्रकाश सावंतदेसाई यांचा वावर त्रासदायक व भावना दुखावणारा ठरू शकतो. त्यामुळे सावंतदेसाई यांची बदली करण्याची मागणी सर्व नातेवाईकांच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अनेक नातेवाईक बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास विद्यापीठावर धडकले. नातेवाईकानी काढलेल्या या मोर्चामध्ये आमदार संजय कदम, भांडूपचे आमदार अशोक पाटील, पंचायत समिती सभापती राजेश गुजर, माजी सभापती चंद्रकांत बैकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बदली अमान्य, निलंबनच हवे

कुलगुरूंना याबाबतचा जाब विचारण्याकरीता गेलेल्या मोर्चाला कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सामोरे गेले. त्यांनी आपल्या दालनात नातेवाईकांना निमंत्रीत केले. यावेळी आमच्या निवेदनाचे काय झाले असा सवाल नातेवाईकांनी केला, मात्र त्यावर समाधानकार उत्तर न मिळाल्याने जमाव संतप्त झाला. यानंतर डॉ. चव्हाण व डॉ. संजय भावे कुलगुरूंकडे मार्गदर्शनासाठी गेले. यानंतर सावंतदेसाई यांची वेंगुर्ले येथे बदली करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र आम्ही आज येथे आलो म्हणून हा निर्णय घेतल्याचा आक्षेप घेत सावंतदेसाई यांच्या निलंबनाशिवाय येथून हलणार नाही अशी आक्रमक भुमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे वापवरण तणावपुर्ण बनले. सावंतदेसाईना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करतानाच पोलीसांकरवी कारवाईचा प्रयत्न झाल्यास प्रकरण अधिक चिघळेल असा गर्भित इशारा मार्चेकऱयांनी दिला.

यावर प्रशासनाला त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा अधिकार नसल्याचे डॉ. सुभाष चव्हाण यांनी मोर्चेकऱयांना सांगितले. यावर मोर्चेकरी अधिकच संतप्त झाले. यानंतर पुन्हा डॉ. चव्हाण व डॉ. भावे यांनी कुलगुरूंचे मार्गदर्शन घेऊन प्रकाश सावंतदेसाई यांना बुधवार दुपारपासून सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, लेखीपत्र दिल्याशिवाय जागेवरून न हलण्याची भुमिका नातेवाईकांनी घेतल्याने याबाबतचे लेखी पत्र मार्चेकऱयांना देण्यात आले.

आवारात फिरकण्यासही मनाई

सावंतदेसाई हे सक्तीच्या रजेवर असताना विद्यापीठातील चौकशी दरम्यान दबाव टाकू शकतात असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. यामुळे जो पर्यंत पोलीसांचा चौकशी अहवाल येत नाही व विद्यापीठ पुढील आदेश देत नाही तो पर्यंत सावंतदेसाई यांना विद्यापीठाच्या परिसरात येणास पायबंद घालावा अशी मागणी देखील मृतांच्या नोतवाईकांनी केली. ती देखील प्रशासनाने मान्य केली.

सावंतदेसाई यांची नार्को टेस्टसाठी मागणी

अपघातात मृत्यूमुखी पडलेले विद्यापीठाचे कार्यक्षम कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूचे विद्यापीठालाही धक्का बसला आहे. या प्रकरणी जर कोणी खरोखर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे असे सांगून विद्यापीठ सावंतदेसाई यांच्या नार्कोटेस्टची मागणी पोलीसांकडे करणार असल्याचे डॉ. सुभाष चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

Related posts: