|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?

पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता? 

रिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय

सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार

सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन

प्रतिनिधी /राजापूर

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छिमार संघटना व कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे. 31 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्यावतीने रत्नागिरीत होणाऱया मोर्चात प्रकल्पग्रस्तांनी सहभागी न होण्याचे आवाहन दोन्ही संघटनांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेला आता या लढय़ामध्ये आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.

राजापूर तालुक्यातील नाणारसह 14 गावांमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक जनतेतून विरोध केला जात आहे. स्थानिकांची प्रकल्प विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना व मुंबईस्थित पदाधिकाऱयांच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने प्रकल्पाविरोधात पक्षविरहीत लढा सुरू केला आहे. तर दुसरीकडे सत्तेतील घटक पक्ष असलेली शिवसेनेनाही सुरूवातीपासून प्रकल्पाला तीव्र विरोध करत आली आहे.

यापुर्वी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत सेनाही सकीय होती. डोंगरतीठा येथे रिफायनरीचा चलेजावचा नारा देण्यासाठी सेनेने पुकारलेल्या आंदोलनातही स्थानिक प्रकल्पग्रस्त मोठया प्रमाणात उपस्थित होते.

मात्र काही दिवसापूर्वीच झालेल्या प्रकल्प विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना व अशोक वालम यांच्या नेतृत्वाखालील संघटनेना यांच्या बैठकीत प्रकल्प विरोधात पुकारलेल्या कुठल्याही पक्षाच्या वैयक्तीक आंदोलनाला सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सर्वपक्षीय आंदोलन असेल तर अशा आंदोलनात सर्वानुमते जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीत ग्रामीण समितीचे अध्यक्ष ओंकार देसाई, दुसरे अध्यक्ष मजीद भाटकर, सचिव भाई सामंत आणि मुंबई संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, सरचिटणीस नितीन जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 31 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले.

स्थानिक व मुंबईतील या संघटनांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता सेनेला आपले अस्तीत्व दाखवण्याची वेळ आली आहे. संघटनांनी घेतलेल्या हा निर्णय प्रकल्पग्रस्त मान्य करणार की त्याकडे दुर्लक्ष करत 31 ऑगस्टच्या मोर्चात सहभागी होणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सेनेने कंबर कसली आहे.

31 रोजी रिफायनरीविरोधी लाँग मार्च

आमदार राजन साळवी यांची माहिती

प्रतिनिधी /राजापूर

दरम्यान कोकण भस्मसात करणाऱया राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पा विरोधात 31 ऑगस्ट रोजी रत्नागिरीमध्ये शिवसेना व रिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटना यांचा लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली. दरम्यान, शेतकरी व मच्छीमार संघटनेने पक्षीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले असून दुसरीकडे आमदार साळवी यांनी एकत्रित लाँग मार्चची घोषणा केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निमित्ताने प्रकल्पग्रस्त संघटनेनेमध्ये फूट पडते कि संघटनेच्या निर्णयाशी ते बांधील राहतात याकडे लक्ष लागले आहे.

नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पा सारखा संहारक व प्रदूषणकारी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने कोंकणावर लादला असून त्यामुळे आंबा, काजू बागायतदार तसेच मच्छीमार मोठय़ा संकटात आले आहेत. या प्रकल्पाला प्रारंभापासून शिवसेना विरोध करीत आहे. या प्रकल्पा विरोधात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हा लॉंगमार्च निघणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्यायभवन रत्नागिरी, कुवारबाव येथून तोंडाला काळ्या पटय़ा लावून हा मोर्चा निघणार असून त्यानंतर शालेय 200 विद्यार्थी मारुती मंदिर येथे लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहेत. त्यानंतर हा लॉंग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. त्यानंतर देशाचे भवितव्य ज्या मुलांकडे आहे त्या शालेय विद्यार्थ्यांकडून व शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना रिफायनरी रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे.

Related posts: