|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » चीनने झळकावले सुवर्णपदकांचे ‘शतक’!

चीनने झळकावले सुवर्णपदकांचे ‘शतक’! 

महिलांच्या डय़ुएट आर्टिस्टिक जलतरण व सायन्क्रोनाईज्ड जलतरणातील दोन सुवर्णपदकांसह चीनने यंदाच्या आशियाई स्पर्धेत सर्वात प्रथम 100 सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम गाजवला. चीनने यंदा आपली घोडदौड उत्तम राबवली आहेच. पण, त्याही शिवाय त्यांचे व त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यातील अंतर देखील लक्षवेधी आहे. चीनने पदकतालिकेत 100 सुवर्णपदकांसह 214 पदके जिंकली होती तर त्यांचा नजीकचा प्रतिस्पर्धी व पदकतालिकेत दुसऱया स्थानी असलेल्या जपानच्या खात्यावर फक्त 51 सुवर्णपदके होती. याचाच अर्थ असा की, चीनने जपानपेक्षा चक्क दुपटीने सुवर्ण जिंकले आहेत. बुधवारी सायंकाळी जपानच्या खात्यावर 51 सुवर्णपदकांसह 160 पदके होती. तिसऱया स्थानावरील दक्षिण कोरियाने 37 सुवर्णपदकांसह 128 पदके जिंकली होती.

चीनने आर्टिस्टिक जलतरण व सिन्क्रोनाईजड जलतरणातील दोन सुवर्णपदकासह ही शतकी मजल गाठली. प्रारंभी, दोघा जलतरणपटूंचा समावेश असलेल्या डय़ुएट आर्टिस्टिक जलतरणात जियांग वेनवेन व जियांन टिंगटिंग या सख्ख्या बहिणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. आश्चर्याची बाब म्हणजे 2006 ते 2010 मधील आशियाई स्पर्धेत देखील या दोघींनी पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. या दोघीही 32 वर्षांच्या आहेत आणि त्याच या इव्हेंटमधील सर्वात वयस्कर जलतरणपटू ठरल्या. मध्यंतरी त्यांनी अडीच वर्षे या क्रीडा प्रकारातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर मात्र नव्याने सुरुवात करत त्यांनी यंदा आशियाई स्पर्धेतील सहावे सुवर्ण जिंकले.

‘फ्लॅमिंगो अँड स्वॅन’या थिमवर जियांग भगिनींनी टेक्किनल व फ्री रुटिनमध्ये बाजी मारली. त्यांनी 186.501 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जपानच्या युकिको इनुई व मेगूमू योशिदा यांनी 182.3363 गुणांसह रौप्य तर कझाकच्या एकतेरिना नेमिच व अलेक्झांड्रा नेमिच या जोडीने 170.8845 गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. सिंगापूरच्या डेबी सोह व रॅशेल थियान या जोडीला 11 संघाच्या या अंतिम फेरीत सातव्या स्थानी समाधान मानावे लागले.

जियांग भगिनींनी 2016 मध्ये पुनरागमन केले व 2017 राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावले. नंतर त्यांनी बुडापेस्ट 2017 फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही सहभाग घेतला आणि तेथे दोन रौप्यपदके जिंकली. ‘पुनरागमन केल्यानंतर आम्ही रोज कसून सराव केला आणि सातत्याने सुधारणा केली. त्रुटींचा अभ्यास केला, त्यावर पर्याय शोधले आणि कधी नव्हे इतके मजबूत झालो. याचमुळे अगदी कठीण रुटीनमध्ये देखील आम्ही लीलया गुण प्राप्त करु शकलो’, अशी प्रतिक्रिया जियांग वेनवेन हिने दिली. त्यानंतर चीनने सायन्क्रोनाईजड जलतरणातही दुसरे सुवर्ण जिंकले आणि यामुळे या संघाने सुवर्णपदकांचे शतकही अगदी थाटात साजरे केले.