|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » अमित, विकास उपांत्य फेरीत

अमित, विकास उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार बॉक्सर अमित पांघल (49 किलो) व विकास कृशन (75 किलो) यांनी विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमित व विकासच्या या विजयासह भारताची किमान दोन पदके निश्चित झाली आहेत. महिलांच्या 51 किलो गटात भारताच्या सर्जुबालादेवीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले.

मंगळवारी झालेल्या पुरुषांच्या 49 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत अमित पांघलने उत्तर कोरियाच्या किम जांगला 5-0 असे एकतर्फी पराभूत केले व उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरियाणाच्या या 20 वर्षीय अमितने प्रारंभपासून आक्रमक ठोसे मारताना प्रतिस्पर्धी किमला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्य फेरीत अमितसमोर फिलिपिन्सच्या पालम कार्लोचे आव्हान असेल. याशिवाय, 75 किलो गटात विकास क्रिशनने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना अंतिम चारमधील आपले स्थान पक्के केले. विकासने चीनच्या इरिबेकेचा अटीतटीच्या लढतीत 3-2 असा पराभव केला. आता, पुढील लढतीत त्याच्यासमोर कझाकस्तानच्या अबिलखानचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, विकासने सलग तिसऱयांदा आशियाई स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले आहे. याआधी, 2010 मध्ये सुवर्ण तर 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

महिलांच्या 51 किलो गटातील उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या सर्जुबालाला चीनच्या चांगकडून 5-0 असा पराभव स्वीकारावा लागला.

Related posts: