|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला

माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला 

व्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव,

मात्र हाती काहीच लागले नाही

वार्ताहर /मार्गताम्हाने

एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत अज्ञात चोरटय़ांविरोधात रामपूर पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने खुर्द येथील बस थांब्यानजीक माजी पोलीस अधिकारी जयसिंग शांताराम मोरे यांचा प्रशस्त बंगला आहे. मोरे व त्यांच्या कुटुंबियाची मुंबईहून गावाला अधून-मधून ये-जा असते. मोरे मुंबईला गेल्याने महिनाभर त्यांचे घर बंदच होते. याचीच संधी साधून चोरटय़ांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंगल्यात शिरकाव केला. टेरेसवरील शिडीचा वापर करुन चोरटय़ांनी प्रथम तळमजल्यावरील व्हेंटीलेटरची काच फोडली. बंगल्यातील हॉलमध्ये असणाऱया गादीच्या खुर्चीवर बुटाचे पाय उमटलेले दिसून येत असून त्यावरून त्यांनी वरून या खुर्चीवर उडी मारल्याचे दिसत आहे. चोरटय़ांनी तळमजल्याच्या व पहिल्या मजल्यावरील अशा दोन बेडरुमचे कडी, कोयंडे तोडून दरवाजे उघडले. त्यांच्या हाताला कपाटाच्या किल्ल्याही सापडल्या. यातील एक कपाट त्यांनी उघडले, मात्र त्यात कपडय़ांव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, मोरे यांच्या बंगल्याच्या आवाराची साफसफाई करणाऱया महिलेला व्हेंटीलेटर फोडण्यासाठी बाहेरुन लावलेली शिडी दिसून आली. यावेळी हा चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी याबाबतची माहिती गावातील प्रमुख ग्रामस्थांना दिली. मोरे यांनाही हा प्रकार कळवण्यात आल्याने ते बुधवारी रात्री मुंबईहून गावाला आले. त्यानंतर रामपूर पोलीस गुरूवारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी करुन मोरे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

बंद घरे, बंगल्यांची सुरक्षा धोक्यात

गेले दोन महिने चिपळूण शहरात फ्लॅट, घरफोडीचे सत्र सुरु आहे. आता चोरटय़ांनी गावांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. विशेषकरुन मुख्य मार्गावरील बंद असलेली घरे, बंगले चोरटय़ांकडून लक्ष्य केली जात आहेत. मार्गताम्हाने व मार्गताम्हाने खुर्द या दोन गावांत चिपळूण-गुहागर मार्गावर व वस्तीपासून दूर काही घरे व बंगले बंद आहेत. काही वर्षांपूर्वी एक बंद बंगला चोरटय़ांनी फोडला होता. आता अशाचप्रकारची घटना पुन्हा घडल्याने रस्त्यालगतच्या बंद घरे व बंगल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Related posts: