|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भुयारी मेट्रोला दहशतवादी हल्ल्याचा धोका

भुयारी मेट्रोला दहशतवादी हल्ल्याचा धोका 

एमएमआरडीचा उच्च न्यायालयात अजब दावा

मुंबई / प्रतिनिधी

‘मेट्रो-2 बी’ या प्रकल्पातील मेट्रोची मार्गिका ठरवताना स्थानिक रहिवाशांशी चर्चा करणे गरजेचे नाही. कायद्यानुसार आम्हाला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, आता ‘मेट्रो-2 बी’ची मार्गिका भुयारी केल्यास दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अजब दावा एमएमआरडीच्यावतीने करण्यात आला.

जेव्हीपीडी परिसरातून जाणाऱया ‘मेट्रो-2 बी’च्या मार्गिकेचे भुयारीकरण करण्यात यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका जुहू-विलेपार्ले रहिवासी संघाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदर याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ‘मेट्रो-2 बी’ (अंधेरी, डी.एन नगर-मंडाले, मानखुर्द)च्या कामामुळे ध्वनीप्रदुषण होणार असून वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे. याप्रकरणी एमएमआरडीएची बाजू मांडताना ऍड. मिलींद साठे यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी सुमारे 11 हजार कोटींचा खर्च येणार आहे. ‘मेट्रो 2 ए’ (दहिसर ते अंधेरी)चे काम एलिव्हेटेड करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ‘मेट्रो-2 बी’चे काम करण्यात येणार आहे. ‘मेट्रो-2 बी’चे काम भुयारी केल्यास या प्रकल्पाला दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय प्रकल्पाचा खर्चही वाढणार असल्याने ‘मेट्रो-2 बी’ भुयारी करता येणार नाही. अंतिम सुनावणी घेऊन त्यावर कोणताही निकाल देण्याआधी याचिकाकर्त्यांना दहा हजार कोटी अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही एमएमआरडीएने केली. एमएमआरडीएच्या या युक्तीवादावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेत ऍड. व्यंकटेश धोंड यांनी ‘मेट्रो-3’च्या भुयारीकरणाला धोका नाही का, असा सवाल एमएमआरडीएला केला. त्यावर एमएमआरडीएला सदर प्रश्नांवर योग्य उत्तर देता आले नाही, दोघांचाही युक्तीवाद ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

दर दिवशी 4.5 कोटीचे नुकसान

कुलाबा ते सिप्झ ‘मेट्रो-3’ या प्रकल्पाच्या खोदकामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी येथील अग्यारींना तडे गेले आहेत. त्यामुळे मेट्रोचे काम थांबविण्यात यावे, अशी मागणी पारसींनी याचिकेद्वारे केली आहे. याबाबत काम थांबल्यामुळे दर दिवशी 4.5 कोटीचे नुकसान होत असल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे.