|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दाभोलकर हत्येच्या ठिकाणी नेऊन अंदुरेची सीबीआयकडून चौकशी

दाभोलकर हत्येच्या ठिकाणी नेऊन अंदुरेची सीबीआयकडून चौकशी 

पुणे / वार्ताहर

अंनिसचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला बालगंधर्व रंगमंदिराजवळील ओंकारेश्वर पुलावर हत्येच्या ठिकाणी नेऊन सीबीआय अधिकाऱयांनी शुक्रवारी त्याची कसून चौकशी करण्यात आली.

हत्येच्या तब्बल पाच वर्षानंतर सीबीआयच्या पथकाने सचिन अंदुरे याला कडेकोट बंदोबस्तात हत्या झालेल्या घटनास्थळावर शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आणले. नेमकी हत्या कशाप्रकारे करण्यात आली, पुलावर येण्याकरिता आणि जाण्याकरिता कोणत्या रस्त्याचा वापर करण्यात आला, दाभोलकर यांची ओळख कशी पटवली, गुन्हा करताना दुचाकी कुठे लावली होती, शस्त्राचा वापर कशाप्रकारे केला, याबाबत त्याची चौकशी करण्यात आली.

अंदुरे याला सीबीआयकडून 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यास 19 ऑगस्ट रोजी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सीबीआयने त्याची डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सखोल चौकशी केली. 26 ऑगस्टला त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. 30 ऑगस्ट रोजी सीबीआयने न्यायालयात अंदुरे याला हजर करत त्याची या प्रकरणात दुसरा हल्लेखोर शरद कळसकर याच्यासोबत समोरासमोर चौकशी करण्याच्या हेतूने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली.

न्यायालयाने ही मागणी मंजूर केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने कळसकर याच्यासमोर अंदुरे याची चौकशी करण्याकरिता कळसकरचा ताबा असलेल्या दहशतवादविरोधी पथकाशी समन्वय साधला. गुह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि पिस्तूल याचा माग काढायचा असल्याचेही सीबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शनिवारी अंदुरे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यास पुणे न्यायालयात सीबीआयच्या वतीने हजर केले जाणार आहे.

अमोल काळेसह तिघांचा ताबा उशिरा

गौरी लंकेश खूनप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित डेगवेकर, राजेश बंगेरा यांना डॉ. दाभोलकर खूनप्रकरणात अटक करायची असल्याने सीबीआयने पुणे न्यायालयातून संबंधित तिघांविरोधात तीन दिवसांपूर्वी प्रोडक्शन वॉरंट घेतले आहे. सध्या हे तिघेजण कर्नाटकातील बेंगळूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा ताबा घेण्याकरिता सीबीआयचे पथक शुक्रवारी बेंगळूरला गेले. मात्र, सीबीआयने कारागृहास सादर केलेल्या पत्रात तांत्रिक चूक असल्याने संबंधित तिघांचा ताबा एक दिवस उशिराने सीबीआयला मिळणार आहे. शनिवारी तिघांना पुणे न्यायालयात सीबीआयच्या वतीने हजर करणे अपेक्षित आहे.