|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोकण रेल्वेमार्ग तीन तास ठप्प

कोकण रेल्वेमार्ग तीन तास ठप्प 

‘बीआरएन’चे इंजीन घसरले : नांदगाव रेल्वेस्थानकानजीकची घटना

कणकवली

रेल्वे ट्रकवर कोसळणारी दरड, माती आदी बाजूला करण्यासाठी वापरण्यात येणाऱया यंत्रणेची वाहतूक करणाऱया (बीआरएन) रेल्वेच्या इंजिनाचे चाक रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेमार्ग तब्बल तीन तास ठप्प झाला होता. ही घटना नांदगाव रेल्वेस्थानकापासून मुंबईच्या दिशेने चार कि. मी. अंतरावर शनिवारी पहाटे 4.15 वा. सुमारास घडली. घटनेनंतर कोकण रेल्वे यंत्रणेमार्फत तात्काळ घटनास्थळ गाठून घसरलेले चाक पूर्ववत रुळावर आणण्यात आले व सकाळी 7.10 वा. सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे रेल्वे ट्रकचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

सदरचे इंजीन मुंबईच्या दिशेने जात होते. नांदगाव रेल्वेस्थानकापासून चार कि. मी. अंतरावर या इंजिनाचे चाक रुळावरून घसरल्याने रेल्वेमार्गच ठप्प झाला. परिणामी कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱया गाडय़ा वेगवेगळय़ा ठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवाव्या लागल्या होत्या. दरम्यान कोकण रेल्वे यंत्रणेने तात्काळ हालचाली केल्या. यात रत्नागिरी येथील अपघात सहाय्य पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या यंत्रणेने घसरेलेले चाक पूर्ववत रुळावर आणले व ते मार्गस्थ केले. त्यानंतर या मार्गावरून रत्नागिरीहून मडगावकडे जाणारी पॅसेंजर, नंतर कोकणकन्या एक्सप्रेस व पुढे अन्य गाडय़ा रवाना झाल्या.

गाडय़ा स्थानकांमध्ये थांबवल्या

घडल्या प्रकाराने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया गाडय़ा ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. यात मुंबईच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांमध्ये मंगला एक्सप्रेस नांदगाव रोड रेल्वेस्थानक, कोचिवेली – डेहराडूण एक्सप्रेस कणकवली रेल्वेस्थानक, डबलडेकर ओरोस रेल्वेस्थानक, मडगावच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांमध्ये रत्नागिरी-मडगाव वैभववाडी रेल्वेस्थानक, दादर-तिरुनवेली ही राजापूर रेल्वेस्थानक, मेंगलोर एक्सप्रेस आडवली रेल्वेस्थानक, कोकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वेस्थानकामध्ये उभी करण्यात आली होती.

अनेक गाडय़ा उशिराने

तब्बल तीन तास रेल्वेमार्ग बंद असल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रकही काहीसे विस्कळीत झाले होते. यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांमध्ये मंगला एक्सप्रेस पाच तास, डबलडेकर दीड तास, कोचिवेली इंदोर एक्सप्रेस चार तास, नेत्रावती एक्सप्रेस तीन तास, कोचिवेली दादर चार तास, मडगावच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांमध्ये कोकणकन्या तीन तास, नागरकोईल एक्सप्रेस दोन तास, दादर तिरुनवेली दोन तास, तुतारी एक्सप्रेस पावणे दोन तास विलंबाने धावत होत्या.