|Sunday, July 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सकळांच्या हत्या येती तुजवरी

सकळांच्या हत्या येती तुजवरी 

गोपी गीताचा भावानुवाद करताना नामदेवराय पुढे म्हणतात-

आम्हावरी कांरे धरियेला राग । 

काय तुझें सांग आम्हीं केलें ।।

रडतसों आम्हीं मारितसों हांका ।

विश्वाच्या जनका नायिकसी ।।

कामाग्नीनें आम्हीं जळतों सकळ । 

करावें शीतळ अधरामृतें ।।

नामा म्हणे देईं एक वेळ भेटी ।

 तुजसाठीं कष्टी फार होती ।।

गोपी भगवंताला म्हणतात-हे भगवंता! आम्ही तुझा काय अपराध केला आहे म्हणून तू आमच्यावर एवढा राग धरलास? हे विश्वाला निर्माण करणाऱया कृष्णा, आम्ही शोक करीत तुला मोठय़ाने हाका मारीत आहोत, त्या तुला ऐकू येत नाहीत काय? तुझ्या विषयीच्या आसक्तीने हा मदन आम्हास जाळीत आहे. म्हणून तू आम्हाला अधरामृत देऊन शांत कर. हे कृष्णा! एक वेळ दर्शन दे. आम्ही तुझ्यासाठी फार कष्टी झालो आहोत असे नामदेवराय म्हणतात.

वाजवोनी वेणू पसरिलें जाळें ।  आम्हांसी न कळे कपटिया तूं ।।दुखवोनी सर्वां टाकियेलें वनीं । गेलासी वधुनी पारधिया ।।धरूनियां धीर न राहावे कृष्णा । देऊं मग प्राणा सकळिकां ।।सकळांच्या हत्या येती तुजवरी । नामा म्हणे हरि भेट आतां ।।

गोपी कृष्णाला म्हणतात-तू वेणुवादन करून मोहजाळ पसरलेस. परंतु तुझे हे कपटनाटक होते, हे आम्हाला समजले नाही. हे पारध्या, आम्हा सर्वांना दु:ख देऊन, रानात टाकून तू येथून निघून गेलास. आणखी काही काळ धीर धरून आम्ही तुझी वाट पाहू, आणि तू जर आला नाहीस तर आम्ही सर्वजणी प्राणत्याग करू आणि मग या सर्वांच्या हत्येचे पाप तुला लागेल, हे घडू नये म्हणून हे कृष्णा तू आम्हाला लवकर दर्शन दे, असे नामदेवराय म्हणतात.

त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ।। अमृतापरीस तुझी कथा अधिक ।

सांगतसे ऐक देवराया ।।स्वर्गीं जें अमृत प्राशन करिती ।

पुण्य सरल्या येती मृत्यु लोकां ।।तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारिं मानसीं याति कांहीं ।।

नाहीं चतुराई बोबडे हे बोल । संतोषे विठ्ठल नामा म्हणे ।।

भगवंताची कथा सांगता सांगता रंगून गेलेले नामदेवराय या अभंगातून कथेचे महात्म्य गोपींच्या मुखातून वर्णन करतात ते असे-या भूलोकात त्रिविध तापांनीं (आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक) प्राणी संतप्त होत असतात, परंतु भगवंताची कथा त्यांचे ताप नाहीसे करते. हे कृष्णा, तुझी ही कथा अमृतापेक्षाही अधिक श्रे÷ आहे. कारण स्वर्गीचे अमृत प्राशन केल्यावर त्यांचे पुण्य संपते व ते मृत्युलोकात परत येतात. परंतु तुझी कथा मात्र अढळ पद प्राप्त करून देते. कथारूपी अमृताने अच्युत पद देत असताना तू कोणाच्याही जातीपातीचा विचार करीत नाहीस. नामदेवराय म्हणतात-हे माझे बोबडे बोल आहेत, हे चातुर्य माझे नाही. श्रीविठ्ठलच माझ्या हातून हे लिहून घेत आहे.

Ad. देवदत्त परुळेकर