|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » भारताचा 184 धावांत धुव्वा, इंग्लंडचा मालिकाविजय

भारताचा 184 धावांत धुव्वा, इंग्लंडचा मालिकाविजय 

चौथ्या कसोटीत यजमानांचा भारतावर 60 धावांनी विजय

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन

भारताची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळल्याने येथे झालेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवशीच भारताचा 60 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. भारताला विजयासाठी 245 धावांचे आव्हान मिळाले असताना इंग्लंडच्या भेदक माऱयासमोर त्यांचा दुसरा डाव 184 धावांत आटोपला. पहिल्या डावात पाच बळी घेणाऱया मोईन अलीने या डावात 4 बळी टिपत सामनावीराचा बहुमान मिळविला. भारतार्फे कोहली व रहाणे यांनी प्रतिकार करीत अर्धशतके झळकवली. पण ती अखेर निष्फळ ठरली. पाचवी व शेवटची कसोटी 7 सप्टेंबरपासून लंडनमध्ये सुरू होणार आहे.

गेल्या तीन दशकांत उपखंडाबाहेर भारताला 200 हून अधिक धावांचे आव्हान गाठता आलेले नाही आणि यावेळी त्यात कोणताही बदल झाला नाही. इंग्लंड संघ हा अलीकडच्या काळातील सर्वात कमकुवत संघांपैकी एक मानला जातो. अशा संघाकडून झालेला पराभव जास्त वेदनादायक ठरला आहे. या संघातीत वय झालेले गोलंदाज अँडरसन, ब्रॉड आणि ऑफस्पिनर मोईन अली (सामन्यात 9 बळी) यांनी 2014 मधील मालिकेप्रमाणे भारतावर वर्चस्व गाजविले. प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्या संघांना कठीण असलेल्या सर्व देशांविरुद्ध भारताने मालिका गमविल्या आहेत.

चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडचे उर्वरित दोन गडी पाचव्या षटकात बाद करून त्यांचा दुसरा डाव 271 धावांत संपुष्टात आणल्याने भारताला 245 धावांचे विजयाचे उद्दिष्ट मिळाले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 69.4 षटकांत 184 धावांत आटोपला. 3 बाद 22 अशी खराब सुरुवात झाल्यानंतर कोहली व रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी शतकी भागीदारी करून आशा निर्माण केल्या होत्या. पण ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव पुन्हा कोलमडला आणि 3 बाद 122 अशा स्थितीनंतर तासाभरातच 9 बाद 163 अशी घसरगुंडी उडाली. कोहलीने 130 चेंडूत 58 तर रहाणेने 159 चेंडूत 51 धावा केल्या आणि दोघांनी 101 धावांची भागीदारी केली. याशिवाय पंतने 12 चेंडूत 18, अश्विनने 36 चेंडूत 25, धवनने 17 धावा केल्या. पहिल्या डावात भारताचा कर्दनकाळ ठरलेला मोईन या डावातही भेदक ठरला. त्याने 71 डावात 4 बळी घेतले. याशिवाय स्टोक्स, अँडरसन यांनी प्रत्येकी 2 तर ब्रॉड व करन यांनी प्रत्येक 1 बळी टिपला.

उपाहारानंतरच्या सत्रात कर्णधार-उपकर्णधार जोडीने सावध फलंदाजी करीत संघाची धावसंख्या हळूहळू वाढवत नेत शतकी भागीदारीसह डाव सावरला होता. पण चहापानाआधी 51 व्या षटकात मोईनच्या चेंडूवर शॉर्टलेगब्प् कोहली कूककरवी झेलबाद झाल्याने भारतावर पुन्हा दडपण आले हेते. कोहलीने 130 चेंडूंना सामोरे जात 4 चौकारांसह 58 धावांचे योगदान देताना रहाणेसमवेत 101 धावांची भागीदारी केली. या सत्रात भारताने केवळ एक बळी गमविला होता.

पंचांकडून कोहलीला जीवदान

सकाळच्या सत्रात तिसरे पंच जोएल विल्सन यांच्या एका चुकीच्या निर्णयाचा फायदा मिळाल्यानेच कोहली सुदैवाने बचावला होता. उपाहारावेळी कोहली 10 व रहाणे 13 धावांवर खेळत होते. टीव्ही पंच विल्सन यांनी भारताच्या 17 व्या षटकात कोहलीला नाबाद ठरविले. पण प्रत्यक्षात चेंडूचा कोहलीच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता आणि तो चेंडू थेट लेगस्टंपवर लागू शकला असता, असे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसून आले. तरीही त्याला नाबाद ठरविले गेले. कोहली व रहाणे यांनी 3 बाद 22 अशा स्थितीनंतर सावध खेळ करीत उपाहारापर्यंत 24 धावांची भर घातली होती. भारताची आघाडी फळी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. शिखर धवन 17, केएल राहुल 0 व चेतेश्वर पुजारा 5 धावांवर बाद झाले. जेम्स अँडरसनने धवनला स्पिमध्ये झेल देण्यास भाग पाडले तर पुजाराने त्याने पायचीत केले. नक्या चेंडूवर चेंडू मुव्ह होत असल्याने भारतीय फलंदाज त्याला सामोरे जाताना पुन्हा एकदा झगडताना दिसून आले. आत येणाऱया चेंडूवरील राहुलचा संघर्ष या डावातही पुढे चालू राहिला. चौथ्या षटकात ब्रॉडने त्याला अशाच एका आता येणाऱया चेंडूवर त्रिफळाचीत केले. 7 चेंडूत त्याला एकही धाव काढता आली नाही. ब्रॉडचा हा चेंडू त्याच्या पायाच्या टोकाला लागून यष्टय़ांवर गेला होता. पुजाराने पायचीतच्या निर्णयाविरुद्ध डीआरएसची मागणी केली. पण त्यातही तो बाद असल्याचे स्पष्ट झाल्याने पंचांचा निर्णय कायम राहिला. कोहली व रहाणे यांनी उपाहारापर्यंत विकेट वाचविण्यात कसेबसे यश मिळविले. रहाणेविरुद्ध पायचीतचे अपील फेटाळल्यानंतर डीआरएस रिप्लेत चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जात असल्याचे दिसून आल्याने तो बचावला.

त्याआधी इंग्लंडने 8 बाद 260 या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि शमीने त्यांना फार मोठी आघाडी वाढवता येणार नाही, याची क्दक्षता घेतली. त्यांचे उर्वरित दोन गडी 4.2 षटकांतच केवळ 11 धावांची भर घालून बाद झाल्याने इंग्लंडचा दुसरा डाव 96.1 षटकांत 271 धावांत संपुष्टात आला आणि भारताला 245 धावांचे विजयाचे उद्दिष्ट मिळाले. शमीने दिवसातील पहिल्याच चेंडूवर ब्रॉडला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले आणि काही वेळानंतर सॅम करन दुसरी अशक्मयप्राय धाव घेताना धावचीत झाला. त्याने 83 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 46 धावा जमविल्या. अँडरसन एका धावेवर नाबाद राहिला. भारतातर्फे शमीने 57 धावांत 4, इशांतने 36 धावांत 2 तर अश्विन व बुमराह यांनी एकेक बळी मिळविले.

धावफलक

इंग्लंड प.डाव 246, भारत प.डाव 273, इंग्लंड दु.डाव : कूक झे. राहुल गो. बुमराह 12 (49 चेंडूत 1 चौकार), जेनिंग्स पायचीत गो. शमी 36, मोईन अली झे. राहुल गो. इशांत 9 (15 चेंडूत 2 चौकार), रूट धावचीत शमी 48 (88 चेंडूत 6 चौकार), बेअरस्टो त्रि.गो. शमी 0 (1 चेडू), स्टोक्स झे. रहाणे गो. अश्विन 30 (110 चेंडूत 2 चौकार), बटलर पायचीत गो. इशांत 69 (122 चेंडूत 7 चौकार), सॅम करन धावचीत 46 (83 चेंडूत 6 चौकार), रशिद झे. पंत गो. शमी 11 (22 चेंडूत 2 चौकार), ब्रॉड झे. पंत गो. शमी 0 (1 चेंडू), अँडरसन नाबाद 1 (9 चेंडू), अवांतर 9, एकूण 96.1 षटकांत सर्व बाद 271.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-24, 2-33, 3-92, 4-92, 5-122, 6-178, 7-233, 8-260, 9-260, 10-271.

गोलंदाजी : अश्विन 37.1-7-84-1, बुमराह 19-3-51-1, इशांत 15-4-36-2, शमी 16-0-57-4, हार्दिक पंडय़ा 9-0-34-0.

भारत दु.डाव : धवन झे. स्टोक्स गो. अँडरसन 17 (29 चेंडूत 3 चौकार), राहुल त्रि.गो. ब्रॉड 0 (7 चेंडू), पुजारा पायचीत गो. अँडरसन 5 (14 चेंडू), कोहली झे. कूक गो. मोईन 58 (130 चेंडूत 4 चौकार), रहाणे पायचीत गो. मोईन 51 (159 चेंडूत 1 चौकार), हार्दिक झे. रूट गो. स्टोक्स 0 (7 चेंडू) ऋषभ पंत झे. कूक गो. मोईन 18 (12 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अश्विन पायचीत गो. करन 25 (36 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), इशांत पायचीत गो. स्टोक्स 0 (5 चेंडू), शमी झे. अँडरसन गो. मोईन 8 (11 चेंडूत 1 चौकार), बुमराह नाबाद 0, अवांतर 2, एकूण 69.4 षटकांत सर्व बाद 184.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-4, 2-17, 3-22, 4-123, 5-127, 6-150, 7-153, 8-154, 9-163, 10-184.

गोलंदाजी : अँडरसन 11-2-33-2, ब्रॉड 10-2-23-1, मोईन अली 26-3-71-4, स्टोक्स 12-3-34-2, करन 3.4-2-1-1, रशिद 7-3-21-0..

Related posts: