|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विक्रमांचे वेताळ

विक्रमांचे वेताळ 

सतत चांगले विक्रम करणाऱया आणि ते मोडणाऱया लोकांविषयी मला अतोनात आदर आहे. डॉन ब्रॅडमन नावाच्या महान खेळाडूने एक विक्रम केला होता. नंतर तो सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रवीड या तिघांनी तोडला. तरी देखील या तिघांच्या मते डॉन ब्रॅडमन हेच त्यांच्यापेक्षा महान होते. क्रीडाक्षेत्रात असे नेहमी घडत असते. चित्रपटक्षेत्रातही घडते. अमुक सिनेमाने इतके कोटी रुपये मिळवले, तमुक सिनेमाने तो विक्रम मोडला, वगैरे आपण ऐकतो. यात मात्र थोडी फसवणूक असते. कारण महागाईमुळे दिवसागणिक रुपयाची किंमत घसरत असते. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी एखाद्या सिनेमाला एक कोटी रुपये मिळाले आणि आज नव्या सिनेमाला एक कोटी रुपये मिळाले यात फरक असतो. चार वर्षांपूर्वी माझी स्कूटर चाळीस किलोमीटर जाण्यासाठी सत्तर रुपयांचे पेट्रोल प्यायची. आज तितकेच अंतर जाण्यासाठी ती पंच्याऐंशी रुपयांचे पेट्रोल पिते. याचा अर्थ स्कूटर अधाशी झाली असे नाही, तर रुपयाची किंमत घसरून पेट्रोलची किंमत वाढली. असो. आदर बाळगावा अशा विक्रमांखेरीज आता इतर विक्रमांकडे आपण नजर टाकू.

काही लोकांच्या खांद्यावर हा विक्रमांचा वेताळ कायमचा बसलेला असतो. कोणी दाढी, मिशा, केस, नखे वाढवण्याचा विक्रम करतो आणि त्याची नोंद होण्यासाठी धडपडतो. काही दशकांपूर्वी एका इसमाने काचा खाण्याचा विक्रम केला होता. टीव्हीवर त्याला कचाकचा काचा खाताना पाहून काय म्हणावे हे सुचेनासे झाले होते. निवडणुका आल्यावर काही पुढारी थापा मारण्याचे नवनवे विक्रम रचताना दिसतात. अशा विक्रमांची शिसारीच येते.

देवाने चांगला गळा आणि अभिनय दिलेले काही कलाकार विक्रमांच्या अट्टहासापायी स्वतःच्या शरीरावर अन्याय करतात तेव्हा वाईट वाटते. मनसोक्त गावे. उत्तम अभिनय करावा. पण विक्रम करायचा म्हणून सलग शंभर तास गाणी गाऊन किंवा एकाच दिवशी-रात्री सलग पाच-पाच नाटकात काम करून आपल्या स्वरयंत्रावर अन्याय का करतात हे लोक? 

हे भाबडे कलाकार परवडले. पण सोशल मीडियावर एका एकतीस डिसेंबरला एका कवीचे निवेदन वाचले. “उद्यापासून वर्षभर मी रोज पंचवीस कविता लिहिणार.’’

निवेदन वाचूनच माझे डोळे पांढरे झाले. देवा, या लोकांचे विक्रमांच्या वेताळापासून आणि आमचे या विक्रमवीरांपासून रक्षण कर रे.