|Friday, April 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आशियाई सुवर्णझेप

आशियाई सुवर्णझेप 

काही विक्रमी विजय तर काही स्पर्धा विक्रम, काही देशांची विक्रमी पदके तर काही देशांची सपशेल निराशा, काही खेळाडूंची भरीव कामगिरी तर काहींचे अचानक रसातळाला पोहोचणे, अशा यशापयशाच्या हिंदोळय़ात यंदाची आशियाई स्पर्धा संपन्न झाली. अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेने आशियाई क्रीडा वर्तुळ खऱया अर्थाने ढवळून काढले. ज्याप्रमाणे ब्रिज, कुराशसारख्या खेळातील पदकांमुळे देशाची मान उंचावली, त्याचप्रमाणे, हॉकी-कबड्डीत सुवर्ण जिंकण्यात आलेले अपयश डोळय़ात झणझणीत अंजन घालणारे ठरले. कुस्तीत सुशीलकुमारचे पहिल्याच फेरीत पराभूत होणे खडबडून जागे करणारे ठरले तर याचवेळी विनेश फोगट, बजरंग पुनिया यांची सुवर्णपदके मात्र कुस्तीतील शान टिकून आहे, याचा दाखला देणारी ठरली. राही सरनोबतने अनुभव पणाला लावत पदक खेचून आणले तर सौरभ चौधरी, शार्दुल ठाकुरसारख्या युवा खेळाडूंची कारकीर्द यापुढे बहरत राहील, असे संकेत या स्पर्धेच्या निमित्ताने लाभले. 15 सुवर्ण, 24 रौप्य व 30 कांस्य, अशा 69 पदकांनी भारताची झोळी कधी नव्हे इतकी भरली. पण, तरीही हमखास जिंकता येतील, अशा हॉकी-कबड्डीसारख्या खेळातील निराशा अर्थातच चिंतेची ठरली. जिंकलेल्या पदकसंख्येच्या निकषावर भारताने सर्वोत्तम कामगिरी साकारली. यापूर्वी 2010 च्या स्पर्धेत आपण सर्वाधिक 65 पदके जिंकली होती तर 1954 फिलीपीन्स स्पर्धेत आपल्याला सर्वात कमी 13 पदकांवर समाधान मानावे लागले होते. मागील चार स्पर्धांची तुलना करायची तर 2006 मध्ये भारताने 10 सुवर्णपदकांसह 53 पदके जिंकली तर 2014 मध्ये 11 सुवर्णपदकांसह 36 पदकांवर आपले नाव कोरले. 1990 पासून आशियाई स्पर्धेचा अविभाज्य घटक असलेल्या कबड्डीत आपण आजवर सर्वाधिक पदके जिंकली आहेत. पण, तेथे पुरुष व महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदके हुकली आणि तीच पुनरावृत्ती हॉकीत देखील झाली. वास्तविक, पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात होता. उपांत्य फेरीपर्यंतच या संघाने 74 गोलांची आतषबाजी केली होती. उपांत्य फेरीत 12 व्या मानांकित मलेशियाचा संघ समोर असेल, हे निश्चित झाल्यानंतर भारताचा संघ मनाने अंतिम फेरीतच पोहोचला होता. पण, मलेशियाने उशिरा केलेल्या गोलच्या बळावर सर्वप्रथम भारताशी बरोबरी साधली आणि त्यानंतर शूटऑफमध्ये भारताच्या आव्हानाचाच शुटऑफ केला. महिला गटातही पदरी अपयशच आले. अर्थात, सेपाक टकराव, ब्रिजसारख्या भारतात काहीही परंपरा नसलेल्या खेळात मिळवलेले यश लक्षवेधी ठरले. बेळगावच्या मलप्रभा जाधव या कन्येने तर चक्क कुराशमध्ये कांस्य संपादन केले. आशियाई स्तरावर कसलेले प्रतिस्पर्धी समोर उभे ठाकलेले असताना कोणतेही पदक जिंकणे सोपे नसतेच. पण, मलप्रभाने कांस्य जिंकताना कुराशविषयी जागृती होण्याच्या दिशेने देखील महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. तिच्यामुळे कुराशविषयी उत्सुकता वाढेल आणि त्याचे धडे गिरवले जातील, ही अपेक्षा साहजिकच. भालाफेकीत नीरज चोप्रा तर अरपिंदर सिंगचे तिहेरी उडीतील सुवर्ण त्या-त्या खेळातील भारतासाठी मिळालेले पहिलेच सुवर्ण ठरले. कोल्हापूरची राही सरनोबत देखील आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिलीच भारतीय नेमबाज ठरली. ब्रिजमधील सुवर्ण मात्र आश्चर्याचे ठरले. ब्रिजला अद्याप मान्यता नसली तरी हा खेळ कसा तळागाळापर्यंत रुजत चालला आहे आणि भारतात तो किती लोकप्रिय आहे, हे देखील यानिमित्ताने दिसून आले. तसे पाहता, ब्रिजच्या देशभरात सातत्याने या ना त्या ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतच असतात आणि त्यात हिरिरीने सहभागी होणाऱया ब्रिज खेळाडूंची संख्या अजिबात कमी नाही. यंदा भारतीय संघातर्फे 572 ऍथलिट 39 इव्हेंट्समधून सहभागी झाले. पण, आश्चर्य म्हणजे 69 पदके जिंकली असली तरी ती या 39 इव्हेंट्सपैकी फक्त 18 इव्हेंट्समधूनच जिंकली आहेत. याचाच एक अर्थ असाही आहे की, 39 पैकी चक्क 21 प्रकारात आपण एकही पदक जिंकू शकलेलो नाही. अर्थातच, ही आकडेवारी 50 टक्यांपेक्षा वर जाते. पदकतालिकेत चीनने घेतलेली झेप मात्र निश्चितच स्पृहणीय आहे. दुसऱया क्रमांकावरील नजीकचे प्रतिस्पर्धी जपानपेक्षा त्यांनी चक्क दुपटीने सुवर्णपदके जिंकावीत, यातच त्यांचे यश आणि त्यांची क्रीडा धोरणातील खुबी लपलेली आहे. क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घ्यायची असेल तर त्याप्रमाणात खडतर सराव करावा लागतो, काटेकोर धोरणे राबवावी लागतात, हे त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले. भारताची स्थिती मात्र बरीच वेगळी आहे. 1951 व 2018 आशियाई स्पर्धेतील तुलना येथे डोळय़ात अंजन घालणारी ठरेल. 1951 मध्ये म्हणजे आजपासून साधारणपणे चक्क 67 वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत आपण 15 सुवर्णसह एकूण 51 पदके जिंकली होती आणि आश्चर्य म्हणजे यंदाही त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. आजही आपली सुवर्णपदके पंधराच आहेत तर एकूण पदके काहीशी वाढून 69 पर्यंत पोहोचली आहेत. त्या तुलनेत चीन 1974 आशियाई स्पर्धेत सर्वप्रथम खेळले आणि त्यांनी 33 सुवर्णसह 106 पदके जिंकली. चिंतेची बाब म्हणजे त्यावेळी आपण 28 पदके जिंकली होती तर त्यात 4 सुवर्ण होते. पण, आता चीन 289 पदकांवर पोहोचला आहे तर आपण 1951 प्रमाणे अद्याप पंच्याहत्तरी पार करण्याच्या उंबरठय़ावरच आहोत. पण, म्हणतात ना, देर आए, दुरुस्त आए, त्याचप्रमाणे आपली वाटचाल सुरू आहे. राजवर्धन राठोड हे माजी ऑलिंपिक क्रीडापटू क्रीडा मंत्री झाल्यानंतर अनेक स्वागतार्ह बदल दिसून येत आहेत आणि हाच सिलसिला पुढे सुरू राहिला तर भारताला अशा प्रतिष्ठांच्या स्पर्धांमध्ये यापेक्षा भरीव यश संपादन करणे अजिबात कठीण नसेल.

Related posts: