|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भुजबळांना देशात कुठेही फिरता येणार

भुजबळांना देशात कुठेही फिरता येणार 

ऑनलाईन टीम / मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्व परवानगीशिवाय देशभरात कुठेही जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. मुंबईबाहेर राज्यात कुठेही जाताना त्यांना कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज भासणार नाही. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जाताना त्यांना तपास अधिकाऱयांना आपल्या वास्तव्याचा ठावठिकाणा कळवणं बंधनकारक राहील. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

प्रदीर्घ कारावासानंतर 4 मे 2018 रोजी भुजबळ यांना अखेर जामीन देण्यात आला होता. त्यावेळेस जामिनासाठी घालण्यात आलेल्या अटींपैकी एक अट म्हणजे मुंबईबाहेर जाताना त्यांना कोर्टाची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली होती. भुजबळ यांनी ती अट शिथील करण्यात यावी यासाठी अर्ज करताना आपण एक आमदार असून आपल्याला आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी सतत मुंबईबाहेर जावे लागते, तसेच आपातकालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटले होते. त्याचबरोबर आपण महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य असून त्यासाठी राज्याबाहेर जावे लागते असे म्हटले. त्याशिवाय आपण यापूर्वी आठवेळा कोर्टाची परवानगी घेऊन मुंबईबाहेर गेलो होतो, याची माहितीही कोर्टाला दिली. आपल्याला अटक होण्यापूर्वी आपण परदेशात होतो आणि आपल्या विरोधात कारवाई सुरु आहे, याची माहिती असतानाही आपण देशात परतलो होतो. याचीही आठवण यावेळी कोर्टाला करुन देण्यात आली. त्यामुळे आपण कायदेशीर प्रक्रियेपासून पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा भुजबळांच्या वतीने करण्यात आला. तेव्हा आपला अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांच्याकडून कोर्टाला करण्यात आली. ईडीने मात्र भुजबळांच्या या अर्जाला हायकोर्टात विरोध केला. भुजबळ यांची राज्याबाहेरही मालमत्ता आहे. त्यांच्या विरोधात खटला सुरु असताना ते राज्याबाहेर पूर्वपरवानगी न घेता गेल्यास खटल्याला ते प्रभावित करु शकतात, अशी शंका व्यक्त केली गेली. पण कोर्टाने भुजबळांच्या वतीने करण्यात युक्तीवाद आलेला युक्तीवाद मान्य करत त्यांना देशात पूर्वपरवानगीशिवाय प्रवास करण्यास मान्यता दिली आहे