|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कामक्रोधें केलें घर रितें

कामक्रोधें केलें घर रितें 

गोपी गीताचा भावानुवाद करताना अखेरीस नामदेवराय म्हणतात- तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ।। दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ।। बोलवेना आतां । कंठ शोषला अनंता ।।

ऐसें पाहोनियां । नामा म्हणे आली दया ।। गोपी कृष्णाला म्हणतात-तुझे दर्शन होत नाही म्हणून आमचे प्राण जाऊ पाहत आहेत, असे असताना, हे नारायणा! तुला आमची दया का येत नाही. आमचा कंठ कोरडा पडला आहे, त्यातून शब्द बाहेर फुटत नाहीत. गोपींची ही अवस्था पाहून कृष्णाला दया आली, असे नामदेवराय म्हणतात.  श्रीमद्भागवतात गोपी गीत केवळ 19 श्लोकांमध्ये वर्णिले आहे. पण भागवत प्रेमींच्या दृष्टीने याचे महत्त्व इतके आहे की या गोपी गीतावरच अनेक पृ÷ांचे अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. अनेक ठिकाणी या गोपी गीतावरच चिंतनाचे अनेक सत्संग प्रतिवषी होत असतात. या महत्त्वपूर्ण गोपी गीताबद्दल भागवताचार्य वै. डोंगरे महाराजांच्या चिंतनाचा काही अंश आता आपण पाहू. विरहाने व्याकुळ झालेल्या गोपी कृष्णाचे गुणगान करू लागल्या. हेच आहे गोपी गीत. गोपींना वाटले की जर यमुनेच्या काठी जाऊन स्तुति केली तर श्रीकृष्ण अवश्य प्रकट होतील. गोपी गीताचा पाठ तर पुष्कळ लोक करतात, परंतु हा पाठ गोपीभावाने केला पाहिजे. ईश्वराच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या जीवाला या जगांत कोठेच चैन पडू शकत नाही. जर अत्यंत आर्त स्वराने भगवंताला हाक माराल तरच ते येऊन भेटतील. अत्यंत आर्ततेने गोपी गीत गाइले पाहिजे. सुखावसाने, दु:खावसाने आणि देहावसाने भगवंताची स्तुति करावी. दु:खाच्या वेळी असा विचार करावा की दु:खाचे किती का पहाड असेनात तरीपण भगवंतांनी आमच्या पापाच्या मानाने कमीच दंड दिला आहे. गोपी गीताचा छंद इंदिरा आहे. इंदिरा अर्थात लक्ष्मी. गोपी लक्ष्मी आहेत म्हणून गोपी गीत इंदिरा छंदात निबद्ध आहे. गोपी परमात्म्याची स्तुति करीत आहेत- कन्हैया! तुझ्यामुळेच तर आपल्या वृंदावनाची शोभा वाढली आहे. पहिले इथे सौंदर्य नव्हते. नाथ! तुझ्याच आगमनामुळे व्रजभूमी शोभायमान झालेली आहे! मानव शरीरच तर व्रज आहे. जर या शरीररूपी व्रजांत प्रभु प्रकट होतील तर त्याची शोभा आणखी वाढेल, त्याचे मूल्य वाढेल, त्याचा जयजयकार होईल. भगवंताच्या जवळ घेऊन जाण्यात आम्हाला जे सहाय्य करते तेच हे शरीर व्रज आहे. या शरीराची शोभा वस्त्राभूषणाने नाही, भगवंताच्या भक्तीनेच वाढते. नाथ! तुमच्याच मुळे माझ्या व्रजशरीराची शोभा आहे. आपण प्रकट झाल्यामुळेच आमची शोभा वाढू शकली आहे. शरीराचे सिंहासन जेव्हा काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सरापासून मुक्त होईल तेव्हाच परमात्मा धावत येतील. तुकाराम महाराज म्हणतात- तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें। कामक्रोधें केलें घर रितें ।। या उलट आपल्या शरीरात देवाला राहायला जागा कुठे आहे? काम, क्रोधादी विकारांनी आपले शरीर भरले आहे.

Ad. देवदत्त परुळेकर