|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्हॉट्सऍप : शाप की वरदान

व्हॉट्सऍप : शाप की वरदान 

जुनी माणसे बोलता बोलता व्यावहारिक सत्य सांगायची. उदाहरणार्थ- “दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं.’’ हल्ली सतत येणारे व्हॉट्सऍपवरचे मेसेजेस या म्हणीची सत्यता पटवून देत असतात. व्हॉट्सऍपवर शंभर मेसेजेस आले तर एखादा खरा निघतो. चूक व्हॉट्सऍपची नाही. मेसेज फॉरवर्ड करणाऱयांची आहे. 

व्हॉट्सऍपचा मूळ उद्देश काय, तर घाई असेल तेव्हा महत्त्वाचा निरोप, मजकूर, फोटो, ध्वनिफीत किंवा चित्रफीत इच्छित व्यक्तीपर्यंत पटकन आणि स्वस्तात पोचवता यावी. काही लोक हा उपयोग करीत असतीलही. पण अनेक लोक काय करतात, तर कोणीतरी पाठवलेला मेसेज न वाचता सर्व परिचितांना फॉरवर्ड करतात. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हणणारे, सणावारांच्या शुभेच्छा देणारे, सुभाषिते वगैरे मेसेजेस.

पण काही मेसेजेस मात्र धोक्मयाचे असतात. जुने फोटो थोडे बदलून कोणाविषयी तरी गैरसमज पसरवून भावना भडकवणारे खोटे मेसेजेस यात मोडतात. लोक सत्यतेची शहानिशा न करता फॉरवर्ड करतात. सरकारने वारंवार सांगूनही लोक हा आंधळेपणा सोडत नसतील तर त्यात व्हॉट्सऍपचा काय दोष? या बाबतीत विदेशी लोक आपल्याहून हुशार आहेत असं समजायचं कारण नाही. विदेशातून आलेले दोन आंग्ल मेसेजेस पहा.

हॉर्वर्ड विद्यापीठाच्या संचालकांना भेटायला फाटक्मया पोषाखात एक वृद्ध जोडपे आले होते. त्यांनी विनंती केली की आमचा एकुलता एक मुलगा तुमच्याकडे एक वर्ष शिकला आणि दुर्दैवाने अपघातात त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ आम्ही इथे एक इमारत बांधून देऊ इच्छितो. संचालकांनी इमारतीची किंमत 75 लाख रुपये सांगितल्यावर जोडप्याने विचार केला की इतक्मया पैशात आपण नवे विद्यापीठ काढू. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठ काढले. (स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ही हकिकत खोटी असल्याचे जाहीर केले आहे.)

अशीच आणखीन एक लोणकढी व्हॉट्सऍपवर फिरत असते. ब्रेंडा नावाची एक तरुणी गिर्यारोहणासाठी गेली असताना शिखरावर तिला ठेच लागून तिच्या डोळय़ातील काँटॅक्ट लेन्स खाली पडली. आता काय करणार? हताश होऊन तिने ईश्वराची प्रार्थना केली की देवा तुला सगळी पृथ्वी दिसते. मला माझी काँटॅक्ट लेन्स शोधून दे, आणि काय आश्चर्य. खालून गिर्यारोहकांची एक तुकडी येत होती. त्यांना ती काँटॅक्ट लेन्स मिळाली होती. ती कुठे मिळाली हे विचारल्यावर त्यांनी सांगितले की एक मुंगी ही काँटॅक्ट लेन्स घेऊन शिखराकडे येत होती.