|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमकडून खड्डे बुजविण्यास सुरुवात

हेस्कॉमकडून खड्डे बुजविण्यास सुरुवात 

बेळगाव / प्रतिनिधी

भूमिगत वीजवाहिन्या घालताना रस्ते खोदण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना या खड्डय़ांचा त्रास होऊ नये यासाठी हेस्कॉमकडून तात्पुरत्या स्वरुपात खड्डे भरण्यात येत आहेत. मंगळवारी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर व माजी महापौर सरिता पाटील यांनी या कामाची पाहणी केली.

वीजवाहिन्या घालताना पडलेल्या खड्डय़ांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेशभक्तांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वारंवार हेस्कॉमकडे करण्यात येत होती. परंतु सध्या पावसाचा कालावधी असल्याने खड्डे बुजविणे शक्मय होत नव्हते.

गणेशभक्तांना या खड्डय़ांचा त्रास होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मंगळवारी किर्लोस्कर रोड, अनसुरकर गल्ली परिसरातील खड्डे बुजविण्यात आले. यामुळे गणेशभक्तांचा काही प्रमाणात का होईना त्रास कमी होणार आहे.

एरियल बंच केबल घालण्याचे काम अंतिम टप्प्यात

एरियल बंच केबल घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मंगळवारी बापट गल्ली कार पार्किंग परिसरात या केबल घालण्यात आल्या. मंगळवारी या परिसरातील दुकाने बंद असल्याने हेस्कॉम कर्मचाऱयांना त्या सुरळीतपणे घालणे शक्मय झाले. उर्वरित काम येत्या शनिवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.