|Monday, November 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सोशल फौजी!

सोशल फौजी! 

सोशल मीडियाचा वापर करून लष्करी अधिकारी, जवानांना हनीट्रपमध्ये अडकवले जात आहे, त्यामुळे भारतीय लष्करातील जवानांनी सोशल मीडियाचा वापर करावा की नको, त्यांनी यापासून दूर रहावे वगैरे चर्चा आणि सल्ले गेले काही दिवस सुरू होते. त्याला अखेर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पूर्णविराम दिला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लष्करालाही सोशल मीडियासारखे हत्यार वापरण्याची गरज आहे. जवानांना त्याचा वापर करण्यापासून रोखता येणार नाही. शिस्तीच्या चौकटीत राहून जवानांनी त्याचा वापर करावा. सीमेपलीकडून शत्रूराष्ट्राकडून होणाऱया दहशतवादाच्या विरोधात हे प्रभावी अस्त्र वापरले जावे असे दिल्ली येथे सशस्त्र सेना आणि सोशल मीडिया या विषयावर झालेल्या एका चर्चासत्रात लष्करप्रमुखांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे स्वागतच केले पाहिजे. सोशल मीडियाच्या प्रभावापासून देशातलाच नव्हे तर जगातला कुठला प्रागतिक घटक प्रभावीत झाला नसेल तर ते नवलच. अशा काळात केवळ सैनिकांनी यापासून दूर रहावे अशी अपेक्षा करणेही चुकीचे. काही महिन्यांपूर्वी सुटीवर आलेल्या एका सैनिकाला लोकांनी सन्मानित केले. अनुभव कथन करण्यास प्रोत्साहित केले. तेव्हा त्याचे पहिले वाक्य होते, चार दिवस झाले घरी येऊन. घरच्यांची ख्याली खुशाली जाणण्यात दोन दिवस गेले…आणि मुलाला मी तुझा पिता आहे ही ओळख पटवण्यात चार दिवस गेले…. अजून त्याला माझी ओळख पटलेली नाही…. या त्याच्या वक्तव्याने उपस्थितांच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. आयुष्याची उमेदीची 17 ते 32 वर्षे विविध पदावरील जवान ते अधिकारी सैन्याला म्हणजेच देशाला बहाल करतात. ती वर्षे परिवाराप्रतीच्या कर्तव्यांचीही असतात. अशा काळात सैनिक सीमेवर आपल्या देशाप्रतिचे, देशबांधवांप्रतिचे कर्तव्य पार पाडतो. हिमालयाच्या उंचीवर बर्फाशी टक्कर देत, वाळवंटातील तापत्या वाळूत करपत, समुद्रापासून आकाशापर्यंत सर्वत्र त्याची झुंज सुरू असते. देशप्रेमाने भारलेले मन आणि त्याचवेळी कुटुंबाबाबतची हळवी भावना तो जपतो. असा व्यक्ती केवळ हनीट्रपमध्ये अडपेल अशा भीतीमुळे त्याला प्रगत तंत्रज्ञानापासून आता दूर ठेवता येणार नाही, हे लष्कर प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले ते बरेच झाले. कारण आता लढाई केवळ बंदूक आणि बॉंबच्या माध्यमातून होत नाही. भावनिक आणि प्रलोभन हाही हल्ला आहे. एखाद दुसरा अधिकारी सापडला, काही सैनिक सापडले म्हणजे सगळेच पाघळले असे होत नाही. असे अपघात सर्वत्रच घडत असतात. असे कावे जेव्हा लक्षात येतात तेव्हाच त्याचा प्रतिबंधही सुरू होतो. भारतीय लष्कराचे म्हणाल तर, समाजात या विषयावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच लष्कराने त्यावर उपायही केले. संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया धोरण बनविले आहे. फेसबुक, व्हॉट्स ऍप, व्टिटर ही समाजमाध्यमे वापरण्यास मंत्रालयाने बंदी घातलेली नाही. मात्र काही मर्यादा नक्कीच आणलेल्या आहेत. सैनिकांनी आपला गणवेशातील फोटो लावू नये, विविध प्रलोभनांच्या जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये, अधिकृत ओळख, स्वतःची रँक, युनिटची माहिती किंवा लोकेशन जाहीर करू नये. अनोळखी व्यक्तीची पेंड रिक्वेस्टही स्वीकारण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर देशात घडत असलेल्या सामाजिक उलथापालथीवर कोणत्याही चर्चेत सहभागी होऊ नये यासाठीही सैनिकांना सातत्याने सजग ठेवण्याचे काम त्यांच्या त्यांच्या तळावर देशभर सुरू आहे. आज समाजमाध्यमांवर सुरू असणारे आरोप, प्रत्यारोप, जाती, धर्मांवरून केल्या जाणाऱया टिप्पण्या यापासून सैनिक स्वतःला दूर ठेवतो आहे हे भारतीय लष्कराचे मोठेच यश आहे. सैनिकांनी स्वतःहून प्रोफाईलमधले गणवेशातील फोटोही काढून टाकले. इतका सारा बदल देशात चर्चा सुरू होण्यापूर्वी झालेला आहे, याची भारतीय समाजाने दखल घेतली पाहिजे. आजही प्रत्येकाच्या गुपमध्ये एकतरी सैनिक असतो. आपल्या वक्तव्यांनी त्याच्यावर काय परिणाम होत असेल आणि तो या साऱयातून स्वतःला कसे अलिप्त ठेवतो याचा विचार समाजानेही केला पाहिजे. खरेतर सैनिकाला आपल्या सेवाकाळात विसावा, आनंद, विरंगुळा म्हणून या माध्यमाचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळात अनेक सैनिकांनी, अधिकाऱयांनी सैन्यात फावल्या वेळात लेझीम वगैरे पथके स्थापन करून दाखविली होती. आज अनेक सैनिक लिहित आहेत, कथा, कविता, गावाकडच्या आठवणी, तिथल्या चालीरिती यावर ते दूर बसून व्यक्त होत आहेत. आपल्यापेक्षा वेगळय़ा संस्कृतीत गेल्यानंतर आपल्या संस्कृतीचे, तिथल्या व्यवहारांचे मोठेपण आणि खुजेपणही त्यांना जाणवत आहे. ते त्यांच्या लेखणीतून उतरते. अनेक सैनिक नकलांपासून विविध कला जोपासतात. सैनिकांचा महिन्या दोन महिन्यातून जेव्हा बडा खाना असतो तेव्हा या कला बहरून येत असतात. पण, आता त्या आठवणी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये संग्रहित होऊ लागल्या आहेत. लहानपणापासून एकत्र असणारे मित्र सैन्यात वेगळे होतात, काही वेळा सख्खे भाऊही एकाच कंपनीच्या वेगवेगळय़ा युनिटमध्ये सेवेत असतात, त्या सर्वांना मैत्रीच्या धाग्यात बांधायला सोशल मीडिया उपयोगी पडतो. आई, वडील, पत्नी, मुलाबाळांशी हे सैनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कनेक्ट आहेत. घरापासून दूर असूनही ते प्रत्येक आनंदाच्या क्षणात सोशली सहभागी होऊ शकत आहेत, ही चांगलीच बाब आहे. पूर्वीच्या अनेक पिढय़ांनी सहन केलेली मानसिक कुचंबणा या पिढीच्या सैनिकांच्या बाबतीत कमी होत आहे. आपला सैनिक अशा रितीने रिप्रेश होत असताना त्याच्यावर अविश्वास व्यक्त करण्यात अर्थ नाही. उलट जगात संरक्षण क्षेत्रात होणारे बदल, नवी शस्त्रे, आहे त्या शास्त्राचा सुयोग्य वापर, हाताळणी याची अद्ययावत माहिती त्याने घ्यावी यासाठी लष्करही प्रोत्साहित करते आहे. अरमानसारखे लष्कराचे ऍप त्याला जगातील सर्वोत्तम योद्धा बनवत आहे. आपला फौजी अधिक सोशल होतोय, होऊ द्या!

Related posts: