|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गणेशोत्सवात महामार्गावर आठ पोलीस मदत केंद्रे

गणेशोत्सवात महामार्गावर आठ पोलीस मदत केंद्रे 

जादा पाच 108 रुग्णवाहिका तैनात ठेवणार : जादा 78 वाहतूक नियंत्रण पोलीस : वाहतूक पोलीस निरीक्षक संजय डौर यांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

गणेशोत्सवासाठी येणाऱया गणेशभक्तांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग पोलीस वाहतूक विभागाने चोख नियोजन केले आहे. महामार्गावर सिंधुदुर्गात आठ ठिकाणी पोलीस वाहतूक मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जादा 108 रुग्णवाहिका पाच ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत. जिल्हय़ाबाहेरुन जादा 78 वाहतूक नियंत्रक पोलीस मागविण्यात आले आहेत, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी लोक सिंधुदुर्गात मोठय़ा प्रमाणात येतात. यावर्षी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गावरुन प्रवास करणाऱयांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने चोख नियोजन केले आहे. त्यासाठी खारेपाटण ते पात्रादेवीपर्यंत खारेपाटण, तरळे, नांदगाव, हुंबरठ, कसाल, कुडाळ, झाराप व बांदा या आठ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे निश्चित केली आहेत. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसापासून गणेशोत्सव संपेपर्यंत मदत केंदे सुरू राहणार आहेत. महामार्गावर अपघात झाला असेल, वाहतुकीचा खोळंबा झाला असेल तर तात्काळ पोलीस मदत केंद्रातून मदत केली जाणार आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून व सद्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने चौपदरीकरणाच्या कंत्राटदाराकडून क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डौर यांनी दिली.

महामार्गावर अपघात होऊन अपघातात कुणी जखमी झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी 108 रुग्णवाहिका पाच ठिकाणी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर ठेवण्यात येणार आहेत. खारेपाटण, नांदगाव, कसाल, कुडाळ आणि झाराप या पाच ठिकाणी 108 रुग्णवाहिका ठेवल्या जाणार असून शासनाने या पाच अतिरिक्त रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत.

महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे पुरेसे पोलीस संख्याबळ नाही. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीस 21, तसेच जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे 30 पोलीस या व्यतिरिक्त जिल्हय़ाबाहेरुन 78 पोलीस मागविण्यात आले आहेत. पुरेसे पोलीस संख्याबळ उपलब्ध झाल्यावर सर्व आठही पोलीस मदत केंद्रावर प्रवाशांना चांगल्या प्रकारे मदत करता येणार आहे.

महामार्गावरील वाहतूक सुरक्षित राहवी, वाहतुकीस अडथळा ठरू नये, यासाठी गणेशोत्सव कालावधीत चिरे, वाळू वाहतुकीस पूर्ण बंदी राहणार आहे. तसेच अवजड वाहतुकीस बंदी राहणार आहे. मुंबईवरुन येणाऱया चाकरमान्यांनी खासगी वाहनाने प्रवास करताना मुंबई-पुणे कोल्हापूर या चार नंबर राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करून आपल्या सोयिनुसार करून घाट, फोंडाघाट व आंबोली घाट या तीन घाटांचा वापर करावा, म्हणजे प्रवास अधिक सुखकर होईल, असे आवाहन करताना राष्ट्रीय महामार्ग पोलीस वाहतूक विभागामार्फत चोख नियोजन केले असल्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी व्यक्त केला आहे.