|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अटक केलेल्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध

अटक केलेल्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध 

पुणे पोलिसांचा सर्वोच्च न्यायालयात दावा, कृतीचे समर्थन

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नक्षल चळवळ समर्थकांना केलेली अटक ते केवळ विद्रोही विचारसरणीचे आहेत म्हणून नसून त्यांचे नक्षलवादी अतिरेक्यांशी संबंध आहेत, म्हणून आहे, असा दावा पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. या सर्वांविरोधात सरकारकडे भक्कम पुरावा असून त्या पुराव्याच्या आधारेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असाही युक्तिवाद त्यांनी केला.

भीमा-कोरेगाव दंगल आणि इतर नक्षली आणि नक्षलवादा हिंसाचारासंबंधी पुणे पोलीस सध्या चौकशी करीत आहेत. याच संदर्भात त्यांनी 29 ऑगस्टला तेलगु कवी वरवरा राव, व्हर्नान गोन्साल्विस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना नक्षली कारवायांशी संबंध असल्याचा आरोपांवरून अटक केली होती. त्यामुळे देशभरात डाव्या पक्षांनी काहूर उठविले होते. सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करण्यात येत होता.

गेल्या 31 डिसेंबरला एल्गार परिषदेने पुण्यात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात हिंसाचार उसळला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

याचिकाकर्त्यांना अधिकार नाही

अटक केलेल्या नक्षलसमर्थकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका रोमिला थापर, प्रभात पटनाईक, देवकी जैन, सतीश देशपांडे आणि माजा दारुवाला इत्यादींनी सादर केली आहे. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र या याचिकाकर्त्यांना अशी याचिका सादर करण्याचा अधिकारच नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली. याचिकाकर्त्यांचा गुन्हय़ाशी काही संबंध नाही. ते आरोपींचे नातेवाईकही नाहीत. तरीही त्यांनी आरोपींच्या वतीने जामीन अर्जही सादर केले आहेत. हे नियमाच्या विरूद्ध आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

पूर्वीही अटकेत होते

आरोपींना प्रथमच अटक झालेली नाही. त्यांचा इतिहास कलंकित आहे. त्यांना पूर्वीही अशाच गुन्हय़ांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांना कारावासही घडला आहे. त्यांच्या लॅपटॉप आणि संगणकांमधून अनेक प्रक्षोभक आणि गुन्हय़ांना प्रोत्साहन देणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांवरून त्यांचा हिंसाचाराशी असणारा संबंध स्पष्ट होतो.

भीमा-कोरेगाव दंगलींनंतर अटक केलेल्या विल्सन आणि गडलिंग व इतरांकडून महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधील मजकुरावरून या सर्वांनी हिंसाचार माजविण्याची किती तयारी केली होती, ते स्पष्ट होते. शस्त्रखरेदी करण्याचा त्यांची योजना होती, असेही उघड झाले आहे. हे सर्व आरोपी गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता, अशी बाजू पोलिसांनी मांडली आहे.

रीतसर अटकेची अनुमती द्या

वरील पाच जणांना केवळ स्थानबद्ध ठेवून चौकशी योग्यरित्या पूर्ण होणार नाही. स्थानबद्धतेमुळे त्यांच्या हालचालींवर बंधने आली असली तरी ते त्यांच्या सहकाऱयांच्या संपर्कात राहून इतर ठिकाणी असलेले पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यांचे कटकारस्थान व्यापक असून त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी त्यांना अटक करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी प्रतिपादन केले आहे.

Related posts: