|Thursday, July 18, 2019

 

सायंकाळचे बेशिस्त पार्किंग सुरुच : अतिक्रमीत दोन पान टपऱयाही तशाच सुरु

प्रतिनिधी / सातारा

मार्केटयार्ड परिसरात राधिका रस्त्यावर असलेल्या देशी, विदेशी दारु दुकांनासमोरच रस्त्यावर दारु पिणारे मद्यपी तसेच आजबाजूला पानाच्या टपऱयांवर दारु पिण्यासाठी पुरवण्यात येणाऱया बेकायदा कृत्यावर ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर टपऱया तसेच रस्त्यावरच लावण्यात आलेले टेबल गायब झाले आहेत. मात्र, परिसरातील दोन अतिक्रमीत पान टपऱया रस्त्यावर झोकात उभ्या असून पुलावरील हॉटेलसमोर सुरु असलेले बेशिस्त पार्किंग तसेच सुरु आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

मद्यपींची वर्दळ कायम

मार्केटयार्ड परिसरातील राधिका रस्त्यावर दिवसभर मद्यपींची वर्दळ असतेच. मात्र, सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत या परिसरात भर रस्त्यावर दारु पिली जात होती. याबरोबरच दारु विक्रीच्या दुकानासमोर अस्ताव्यस्त दुचाकी पार्किंग होत असल्याने वाहतूकीस त्याचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळीस या परिसरातून जाणे महिला, युवती तसेच नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर रस्त्यावर ग्राहकांना पिण्याचे पाणी व चकना पुरवणारे टेबल, गाडा तसेच परिसरातील टपऱया गायब झाल्या आहेत.

अस्ताव्यस्त पार्किंग तसेच

यामुळे जरी दिलासा मिळाला असला तरी तेथील एका रस्त्यालगत पुलावरच असलेल्या हॉटेलसमोर ग्राहकांची गर्दी होते व तिथे अस्ताव्यस्त दुचाकी पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याबरोबरच दारु खरेदीसाठी जाताना ग्राहक रस्त्यावरच दुचाकी लावत असल्यानेही वाहतुकीस अडथळा होत असून वाहतूक विभागाने संबंधित दुकानचालकांना याबाबत कायद्याचा बडगा दाखवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या परिसरात विद्यार्थ्यांचीही वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. याचा त्रास विद्यार्थ्यांना नाहक सहन करावा लागत असून त्याबाबत कारवाई होणे आवश्यक आहे.