|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » अखेर राम कदम यांनी ट्विटरवरून मागीतली माफी

अखेर राम कदम यांनी ट्विटरवरून मागीतली माफी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लग्न करण्यासाठी मुलींना पळवून आणू, असे बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी अखेर माता-मगिनींची माफी मागितली आहे. माझ्या विधानाने माता-भगिनींची मने दुखावली. त्याबद्दल मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली आहे. माता-भगिनींचा आदर करत मी पुन्हा त्यांची माफी मागतो, अशा शब्दांमध्ये राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे.

दहिहंडी उत्सवातील वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यांच्या या विधानाबद्दल अनेक महिला आणि तरुणींनी संताप व्यक्त केला. राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र दोन दिवस राम कदम यांनी माफी मागितली नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राम कदम म्हणत होते. मात्र संपूर्ण राज्यभरातून संताप होत असल्याने आज अखेर राम कदम यांनी ट्विट करुन महिलांची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मने दुखावली, असे राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे,’ असे राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राम कदम यांच्या विधानाबद्दल भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.