|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एकनूर आदमी दसनूर कपडा

एकनूर आदमी दसनूर कपडा 

सुभाषित-

 वासः प्रधानं खलु योग्यतायाः

वासोविहीनं विजहाति लक्ष्मीः।

पीतांबरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां

दिगंबरं वीक्ष्य विषं समुद्रः।।

अन्वय-

योग्यतायाः वासः प्रधानं खलु । (यतः) वासोविहीनं

लक्ष्मीः विजहाती । (समुद्रमन्थनप्रसंगे) समुद्रः

पीतांबरं (विष्णुं) विलोक्मय स्वकन्यां ददौ । (परंतु)

दिगंबरं (शिवं) वीक्ष्य तं (हलाहलं) विषम् (एव ददौ) ।

अनुवाद-

योग्यतेपेक्षा वस्त्र (वेष)च महत्त्वाचे हे खरे! (चांगला) वेष नसेल तर लक्ष्मी (ही) सोडून जाते. झगझगीत पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली कन्या दिली, तर दिगंबर शिवाला मात्र (हलाहल) विषच दिले.

विवेचन- ‘एक नूर आदमी, दसनूर कपडा’ अशी हिंदीत एक म्हण आहे. माणसाच्या असण्यापेक्षा त्याच्या दिसण्यालाच (अर्थात वेषभूषेलाच) अधिक महत्त्व दिले जाते. हा व्यावहारिक अनुभवच या म्हणीच्या मागे आहे. हीच गोष्ट या सुभाषितात सोदाहरण सांगितली आहे. हे उदाहरण आहे पुराणकाळातील समुद्रमंथनाचे. देव आणि दानव यांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, अमृत, चंद्र, हलाहल विष, इत्यादी चौदा रत्ने बाहेर आली. अमृत देवांनी घेतले तर सुरा असुरांना दिली. इतर रत्नेही वाटून घेतली. परंतु भयंकर विष हलाहल कुणालाच नको होते. ते जगाचा संहार करील, म्हणून शिवाने ते प्राशन केले. (तेव्हापासून त्याचा कंठ निळा झाला. तो नीळकंठ बनला) विष्णूला लक्ष्मी प्राप्त झाली. आता विष्णू हा ऐटबाज पीतांबरधारी हे सर्वश्रुत तसेच शिव हा दिगंबर स्मशानवासी भिक्षाटन करणारा हेही सर्वांना माहीत आहे. तेव्हा या एकूण परिस्थितीवर कवीने हे सुभाषित घेतले आहे. समुद्रातून लक्ष्मी निघाली म्हणून तो तिचा पिता ठरला. आता पिता कन्यादान करताना गडगंज अशी पार्टीच शोधणार! तेव्हा पीतांबरधारी विष्णू हा त्याला जावई बनवायला योग्य वाटला! उलटपक्षी शिव हा दिगंबर म्हणज कफल्लकच! त्याला काय द्यायचे? तर त्याला विषावर समाधान मानावे लागले. इथे शिवाची योग्यता विष्णूहून कमी आहे असे नाही. परंतु झकपक वेषामुळे (आणि वेषरहिततेमुळे) दोघांना वेगवेगळी वागणूक मिळाली. अशी कल्पना करून कवीने आपला मुद्दा मांडला आहे. एखादा अजागळ वेष धारण केलेला गुणी माणूसही दुर्लक्षिला जातो आणि सुमार कुवतीचा पण झकपक कपडे ल्यालेला एखादा भाव खाऊन जातो ही आजची वस्तुस्थिती पाहिल्यावर हे सुभाषित पटते.