|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवतींच्या संरक्षणासाठीच रक्षाकवच शिबिर

युवतींच्या संरक्षणासाठीच रक्षाकवच शिबिर 

वार्ताहर /  एकसंबा:

बसवज्योती युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य हाती घेतले आहे. समाजातील प्रत्येक युवती स्व-रक्षणासाठी स्वत:च्या पायावर उभी रहावी यासाठी रक्षा कवच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन बसवज्योती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.

एकसंबा येथील शिवशंकर जोल्ले पब्लिक शाळेच्या सभाभवनात आयोजित  शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आमदार शशिकला जोल्ले यांनी दीपप्रज्वलन केले. वैष्णवी शाहीर यांनी स्वागत केले. जोल्ले पुढे म्हणाले, गेल्या वर्षभराच्या कालावधीत बसवज्योती युथ फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपणाच्या माध्यमातून परिसर संरक्षण, नद्या प्रदूषणमुक्त होण्यासाठीचे कार्यक्रम, युवकांसाठी उद्योग मेळावे, गुणवंतांसाठी आयएएस, केएएस मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी आमदार जोल्ले म्हणाल्या, महिलांचे केवळ संरक्षण आई, वडील, पती, मुलगा यांच्यामुळे झाले पाहिजे असे नाही. 21 व्या शतकात महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठीची जबाबदारी स्वत: पेलण्यासाठी बसवज्योती युथ फाऊंडेशनतर्फे रक्षा कवच शिबिर ठेवण्यात आले आहे. याचा युवतींना भविष्यकाळात मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापुरचे कुराश असोसिएशनचे प्रशिक्षक शरद पवार म्हणाले, आमच्या संस्थेमध्ये विविध शाळा-महाविद्यालयात युवतींना स्वत:च्या संरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवतींना संघर्ष करण्याची कला, त्यातील कौशल्य, सामर्थ्यांची माहिती देण्यात येते. या भागातील युवतींनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी फाऊंडेशनचे संचालक शिवराज जोल्ले, विजय राऊत, महादेव पाटील, प्राचार्या उर्मिला चौगुले, डॉ. ए. व्ही. कुलकर्णी, राकेश मगदूम, ए. बी. अकोळे, सी. पी. बन्नटी, व्ही. आर. भिवसे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सुधा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिमा तिप्पण्णवर यांनी आभार मानले.