|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सरकारी रुग्णालयीन यंत्रणा गेली ‘कोमात’

सरकारी रुग्णालयीन यंत्रणा गेली ‘कोमात’ 

सुधीर जाधव /सातारा :

सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरण रोगट बनले असून सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आजारपणामुळे शहरातील सरकारी क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करावे लागत आहेत. ऐन पावसाळ्यात वैद्यकीय यंत्रणा कोमात गेली असून खासगी रुग्णालये मात्र जोमात असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे.

रिमझिम पावसामुळे गारठा वाढला असून वातावरण दूषित बनले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन ते साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. संसर्ग होऊन वृद्ध आणि लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत असून सरकारी रुग्णालयात वैद्यकीय नियोजनाचा अभाव असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सरकारी रुग्णालय अद्याप नागरिकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकले नाही, असा आरोपही नागरिकांमधून होत आहे. रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. खराब वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचा फायदा काही खासगी रुग्णालये घेत असून उपचाराच्या नावाखाली भरमसाट ‘फी’ आकारली जात आहे, अशा प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त होत आहेत. पावसाळ्यात साथीच्या आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असते. त्यामुळे आरोग्य विभागाने अगोदरच उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत सरकारी प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही, अशा संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांमधून उमटत आहेत.

 

Related posts: